मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 08:00 AM2024-05-16T08:00:34+5:302024-05-16T08:01:08+5:30
Ghatkopar Hoarding Tragedy Emotional News: मुंबई विमानतळाचा एक बडा अधिकारी सोमवारी सायंकाळपासून गायब होता. अमेरिकेत असलेला त्यांचा मुलगा त्यांना सारखे फोन करत होता.
घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत अनेक इमोशनल स्टोरी आल्या आहेत. कोणाचा एकुलता एक, कोण एकटाच कमविणारा अशा बातम्यांनी मन हेलावून सोडले आहे. अशातच मुंबई विमानतळावरील एका बड्या अधिकाऱ्याचा व त्यांच्या पत्नीचा या होर्डिंगने बळी घेतला आहे. धक्कादायक म्हणजे रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना अमेरिकेत असलेल्या मुलाने त्यांना शोधून काढले आहे.
या होर्डिंग दुर्घटनेनंतर आताही लोखंडी सांगाडा तोडण्याचे काम सुरु आहे. जेवढे शक्य होते तेवढ्या लोकांना रेस्क्यू टीमने बाहेर काढले आहे. आतापर्यंत १७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अशातच मुंबई विमानतळाचा एक बडा अधिकारी सोमवारी सायंकाळपासून गायब होता. अमेरिकेत असलेला त्यांचा मुलगा त्यांना सारखे फोन करत होता. परंतु फोन उचलला जात नसल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि दुर्दैवाने ती खरी ठरली.
या मुलाने मुंबईतील आपल्या मित्रांना फोन करून आई-वडील फोन उचलत नसल्याने त्यांचा शोध घ्या असे कळविले होते. या मित्रांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तोवर मुलाने वडिलांच्या फोनचे लोकेशन शोधले आणि त्याला धक्काच बसला. वडिलांचे लोकेशन घाटकोपरची दुर्घटना घडली तो पेट्रोल पंप होता. पोलिसांना कळविताच मंगळवारी त्यांनी तिकडे धाव घेतली आणि ढिगाऱ्याखाली शोधाशोध सुरु झाली.
मुंबई विमानतळावर ट्राफिक कंट्रोलचे जनरल मॅनेजर असलेल्या मनोज चनसुर्या आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह एका चेपलेल्या एसयुव्हीमध्ये सापडला आहे. सोमवारी सायंकाळी ते मध्य प्रदेशमधील गावी जाण्यासाठी निघाले होते. वाटेत इंधन भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर गेले होते.