घाबरू नका! रुग्णांची वाढ ही कोरोना संपण्याची चिन्ह, दोन आठवड्यात होणार कमी; पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 10:44 AM2023-04-15T10:44:35+5:302023-04-15T10:53:11+5:30

सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. परंतु यात घाबरण्याचं कारण नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

ताप, सर्दी, सर्दी, खोकला या आजारांनी आजकाल बहुतांश लोकांना हैराण केलंय. प्रत्येक कुटुंबात कोणाला ना कोणाला सर्दी खोकला झालेला पाहिलाच असेल.

याचे कारण इन्फ्लूएंझाचा संसर्ग आणि कोरोनाचा पुन्हा प्रसार असल्याचं सांगितलं जात आहे. इन्फ्लूएंझाच्या स्ट्रेनमध्येही बदल झाला आहे आणि कोरोना XBB.1.16 चा नवीन स्ट्रेन देखील पसरत आहे. परंतु सकारात्मक बाब म्हणजे संसर्गानंतरही याचा परिणाम सौम्य आहे. अनेकांना ताप देखील येत नाही.

“यावेळी कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. पण तो सौम्य आहे. बहुतेक लोकांना संसर्ग झाल्यानंतरही लक्षणे दिसत नाहीत. तापही येत नाही,” अशी माहिती एम्सच्या मेडिसिन विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर पीयूष रंजन यांनी दिली.

“ज्यांना तापही आहे त्यांच्यातही सौम्य लक्षणं आहेत. म्हणूनच काळजी करण्यासारखं काही नाही. पण सतर्क राहण्याची गरज आहे. मास्कचा वापर करा. गर्दीत जाणं टाळा, हात स्वच्छ धुवा. हा कोरोनाच्या महासाथीचा अंतही असू शकतो. अशा लहान-मोठ्या लाट येत राहतील, परंतु हळूहळू ते सीझनल इन्फ्लूएंझासारखे बनतील,” असंही ते म्हणाले.

“गेल्या वर्षी ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला होता. यावर्षी त्याचं सब व्हेरिअंट स्ट्रेन XBB.1.16 चा प्रसार होत आहे. ओमिक्रॉनमध्येही रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देऊन संसर्ग पसरवण्याची क्षमता होती आणि यातही आहे,” अशी माहिती इन्फेक्शन एक्सपर्ट डॉ. नरेंद्र सैनी यांनी दिली.

“विषाणूमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. जी रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला पहिले वाचवत होती, आजही तिच रोगप्रतिकारक शक्ती आहे. मग ती लसीची असो किंवा नॅचरल इन्फेक्शनची. दोन्ही स्थितींमध्ये बचाव होत आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रुग्णालयात सरासरी १० ते १२ रुग्ण दाखल केले जातात, परंतु बहुतांश रुग्ण बरे होत आहेत. ओपीडीच्या आधारे जास्त उपचार करावे लागत नाहीत. जे लोक गंभीर आजारी आहेत किंवा ज्यांना न्यूमोनिया होत आहे त्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे. अशा रुग्णांची संख्या खूपच कमी आहे, अशी माहिती एलएनजेपीचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सुरेश कुमार यांनी दिली.

ज्यांना आधीच कोणत्या ना कोणत्या आजारानं ग्रासलं आहे त्यांनाच हा त्रास होत आहे. पुढील दोन आठवड्यांनंतर संसर्ग कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केलं.