मॉर्निंग वॉकला गेलेल्या हत्तीणीचा मृत्यू; अंत्यविधीला हजारो लोकांची गर्दी, मुख्यमंत्रीही गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 07:59 PM2022-11-30T19:59:17+5:302022-11-30T20:03:45+5:30

पुद्दुचेरीच्या मनकुला विनायगर मंदिरातील अत्यंत प्रसिद्ध हत्तीणी लक्ष्मी हिचं निधन झालं आहे. बुधवारी सकाळी फिरायला गेलेल्या लक्ष्मीचा अचानक बेशुद्ध होऊन मृत्यू झाला. लक्ष्मीचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक शोकसागरात बुडाले आहेत.

१९९५ मध्ये वयाच्या ५ व्या वर्षी मनकुला विनायगर मंदिरात आणलेल्या लक्ष्मीला मंदिरातील भक्तांकडून भरभरून प्रेम मिळालं. लक्ष्मीचा शांत आणि सौम्य स्वभाव भक्तांना तिच्याकडे आकर्षित करत असे. आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेली लक्ष्मी अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली.

लक्ष्मी बेशुद्ध पडल्यानंतर महुतने तातडीने पशु वैद्यकीय डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी हत्तीणीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी ठरले. लक्ष्मीच्या मृत्यूची बातमी पसरताच सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. तिच्या अंत्य दर्शनासाठी हजारोंनी गर्दी केली.

लक्ष्मीच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की लक्ष्मीच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये तिच्या मृतदेहाभोवती हजारो लोकांचा जमाव दिसत आहे. क्रेनच्या साह्याने लक्ष्मीचा मृतदेह उचलण्याचे प्रयत्न सुरू असून लोकांनी तिच्या मृतदेहावर पुष्पवृष्टी केली.

विशेष म्हणजे मनकुला विनायगर मंदिराबाबत असे म्हटले जाते की, प्राचीन काळी येथे असलेली गणेशाची मूर्ती अनेकवेळा समुद्रात फेकली गेली होती, परंतु ती मूर्ती पुन्हा त्याच ठिकाणी दिसून आली. या दिव्य मंदिराच्या महत्त्वाचे वर्णन पुराणातही आढळते.

या मंदिरात आल्यानंतर लक्ष्मी एका कुटुंबाप्रमाणे या मंदिराच्या लोकांसमावेत आणि भक्तांमध्ये मिसळून गेली. अशा परिस्थितीत त्याच्या मृत्यूबद्दल लोकांचे भावनिक होणे स्वाभाविक आहे. लक्ष्मीच्या अचानक जाण्यानं अनेकांना धक्का बसला.

लक्ष्मी नावाची हत्ती १९९५ मध्ये एका उद्योगपतीने मंदिर संकुलाला दान केली होती. ही हत्तीण भक्त आणि परदेशी पर्यटकांमध्ये ते खूप लोकप्रिय झाले होते. ही हत्तीण येथे येणाऱ्या भाविकांना आशीर्वाद देत असे त्यामुळे ती इथं प्रसिद्ध झाली होती.

हत्तीणीच्या मृत्यूची बातमी इंटरनेट मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच केंद्रशासित प्रदेशातील विविध भागातून लोक श्रद्धांजली वाहण्यासाठी मंदिर परिसरात आले. हत्तीणीच्या मृतदेहावर फुलांचा वर्षाव करण्याबरोबरच लोकांनी हारही घातला.

हत्तीणीच्या अंत्यसंस्कारावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. क्रेनच्या सहाय्याने ट्रकमधून हत्तीणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी आणि उपराज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी लक्ष्मीला श्रद्धांजली वाहिली.

मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रामचंद्रन यांनी सांगितले की, मुथियालपेट येथील मंदिराच्या रिकाम्या जागेवर लक्ष्मीचे पार्थिव दफन केले आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने या हत्तीणीचं निधन झाल्याचं पशु वैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले.