CoronaVirus: येत्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी होणार? महाराष्ट्र, दिल्लीचे नंबर देत आहेत संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 10:47 AM2021-05-03T10:47:26+5:302021-05-03T10:55:31+5:30

Corona Virus wave will slow down: रविवारी टेस्टिंग कमी होते. यामुळे दर सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसते. मात्र शनिवारी पहिल्यांदाच हा ट्रेंड दिसून आला.

देशात कोरोनाने (Corona Virus) कहर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे (Corona Virus Second wave) दिवसाचे रुग्ण चार लाखांच्या आसपास गेले आहेत. एप्रिलचा पूर्ण महिना कोरोनाच्या वाईट बातम्यांनी झाकोळला गेला. शनिवारी पहिल्यांदाच कोरोना संक्रमितांची संख्या गेल्या आकड्यांच्या तुलनेत कमी होती. (Good news on Corona virus wave from Maharashtra, Delhi for ret of India.)

देशात शनिवारी 3,92,488 रुग्ण सापडले होते. तर रविवारी (आज सोमवारी जाहीर) त्याहूनही कमी म्हणजेच 3,68,147 नवीन रुग्ण सापडले आहेत. हा एक मोठा दिलासा मानावा लागणार आहे. शनिवार, रविवार असल्याने टेस्टिंग कमी झाल्याचा परिणामही या आकड्यांवर दिसून येतो.

देशात शनिवारी कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्यामध्ये 9000 रुग्णांची घट दिसून आली. तर शुक्रवारी देशात 4,01,333 एवढे रुग्ण आढळले होते. संपूर्ण एप्रिलमध्ये एक गेल्या आठवड्यातील सोमवार सोडला तर सर्व दिवसांना कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतच होती.

रविवारी टेस्टिंग कमी होते. यामुळे दर सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसते. तशीच घट आजही दिसून आली आहे. आज देशात 3,417 जणांचा मृत्यू झाला. तर 3,00,732 लोक बरे झाले आहेत.

शनिवारच्या दिवशी हा ट्रेंड पहिल्यांदाच दिसला. कोरोना रुग्णांची आकडेवारी आदल्या दिवशीच्या तुलनेत कमी होती. यामुळे कोरोना लाट कमी होतेय असे म्हणणे उचित ठरणार नाही. परंतू या दिवशी टेस्टिंगही १९ लाखांच्या आसपास झाले होते.

टेस्टिंग नेहमीप्रमाणेच होऊनदेखील कोरोना रुग्णांचा आकडा 9 हजारांनी घटल्याने महाराष्ट्र आणि दिल्ली ही राज्ये देखील काही संकेत देत आहेत.

देशात दुसऱ्या लाटेने सर्वाधिक प्रभावित केलेले कोणते राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे. राज्यात कोरोनाच्या केसेस या 70 हजाराच्या आसपास गेल्या होत्या. एप्रिलमध्ये 20 दिवस कोरोना रुग्णांची संख्या ही 60 हजाराच्या आसपासच घुटमळत होती. गेल्या चार दिवसांपासून यामध्ये घट होताना दिसत आहे.

दिल्लीमध्येही काहीसा महाराष्ट्रासारखा ट्रेंड दिसत आहे. सलग दोन आठवडे दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण 20 हजार पार येऊ लागले होते. उपचार घेत असलेले रुग्ण 1 लाखाहून कमीच होते. ही संख्यादेखील आशेचा किरण देणारी ठरली आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दिल्लीतही पुढील काही दिवसांत रुग्ण संख्या घटेल अशी आशा करत आहेत. महाराष्ट्रातील घट पाहून अन्य राज्यांमध्येही कोरोना रुग्ण घटतील असा अंदाज लावण्यात येत आहे. असे झाल्यास उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्येदेखील कमी येईल.

महाराष्ट्र, दिल्लीनंतर अन्य राज्यांनीही लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे. हरियाणामध्ये आजपासून सात दिवस लॉकडाऊन जाहीर झाला आहे. ओडिसामध्ये 14 दिवस, कर्नाटक, गोव्यामध्ये काही दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.