गुंतवणूक येणार, रोजगार निर्माण होणार; पण 'चायना पॅटर्न'मुळे कर्मचाऱ्यांचे हाल वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:50 PM2020-05-09T15:50:11+5:302020-05-09T16:04:36+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यानं मजुरांचे हाल सुरू आहेत. रोजगारचं नसल्यानं उपजीविकेचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे.

चीनमधून जगभरात कोरोनाचा फैलाव झाला. त्यामुळे अमेरिका, दक्षिण कोरिया, जपानमधील कंपन्या त्यांची चीनमधील उत्पादन निर्मिती केंद्र अन्यत्र हलवण्याच्या तयारीत आहेत.

चीनमध्ये उत्पादन निर्मितीचा खर्च कमी आहे. तिथे कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च इतर देशांच्या तुलनेत फारसा नसल्यानं जगभरातल्या कंपन्यांनी चीनला पसंती दिली. मात्र कोरोनामुळे त्यांनी वेगळा विचार करण्यास सुरुवात केली आहे.

भारताची लोकसंख्यादेखील अतिशय जास्त असल्यानं मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे उत्पादन खर्चदेखील कमी येतो. त्यासाठीच चीनमधून आपली उत्पादन केंद्रं हलवण्याच्या विचारात असलेल्या कंपन्यांनी भारताचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांनी कामगार कायद्यात बदल केले आहेत.

कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कंपन्यांना कामाचे तास वाढवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १२ तास काम करावं लागेल.

जे कर्मचारी १२ तास काम करू इच्छितात, त्यांनाच १२ तास काम करण्यास सांगा, असं या राज्यांनी कामगार कायद्यात बदल करताना स्पष्ट केलं आहे. मात्र १२ तासांच्या नियमाचा उपयोग कामगारांच्या शोषणासाठीच होण्याची शक्यता अधिक आहे.

कामगारांच्या संघटनांनी राज्य सरकारांनी कायद्यात करण्यात आलेल्या बदलांना विरोध केला आहे. मात्र यामुळे अधिक गुंतवणूक येऊन रोजगार वाढतील, असं राज्य सरकारांकडून सांगण्यात येत आहे.

चीनमधून जवळपास १ हजार कंपन्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्यांना भारतात आणण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या कंपन्यांना आपल्या राज्यात आणण्यासाठी भाजपाशासित राज्यांनी कामगार कायद्यात बदल केले आहेत.

चीनमधून येणाऱ्या कंपन्यांनी तिथल्या सारखचं वातावरण मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चीनमध्ये बहुतांश आयटी कंपन्यांमध्ये कामगारांना १२ तास काम करावं लागतं.

कामगारांच्या कामाचे तास वाढवण्यासोबतच त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तरतुदीदेखील बऱ्याचशा प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे. आपल्याकडे आधीच अनेक कंपन्या नियम धाब्यावर कामगारांची पिळवणूक करतात. त्यात आता आणखी भर पडेल, अशी संघटनांची भूमिका आहे.

चीनमधील बऱ्याचशा आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना १२ तास काम करावं लागतं. त्याला चीनमध्ये ९९६ सिस्टिम म्हणतात. सकाळी ९ ते रात्री ९ आठवड्याचे ६ दिवस चीनमधील कर्मचारी काम करतात.

चीनमधील कर्मचारी आठवड्याला ७२ तास काम करतात. यावरुन जगभरातून चीनवर टीका होते. मात्र चरीही तिथल्या सरकारनं यामध्ये जराही बदल केलेला नाही.