बापरे! शाळा सुरू केल्यावर कोरोनाचा धोका वाढला; 15 विद्यार्थी पॉझिटिव्ह, पालकांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 11:21 AM2021-02-17T11:21:13+5:302021-02-17T11:36:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं.

कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल एक कोटीवर पोहोचला आहे. एकूण कोरोनागस्तांची संख्या 1,09,37,320 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 1,55,913 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबररदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं.

शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून 15 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. पंजाबच्या लुधियानात असलेल्या गावातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लुधियानाच्या चौंटा गावातील एका शाळेतील दोन शिक्षक आणि 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घावा लागला आहे.

लुधियानाच्या उपायुक्तांनी तातडीने ही शाळा दोन मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच स्थानिक प्रशासनाने कोरोनाची लागण झालेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आंध्र प्रदेशमध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली आहे. शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 2 नोव्हेंबरपासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्या आहेत. पण कोरोनाच्या संकटात शाळा सुरू करणं चांगलंच महागात पडलं.

जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "आंध्र प्रदेशमध्ये 2 नोव्हेंबर रोजी 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांत जवळपास 262 विद्यार्थी आणि 160 शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे" अशी माहिती दिली होती.

शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. याआधी कर्नाटकमध्येही परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती.

काही महिन्यांपूर्वी इस्त्राईलच्या शाळेतील 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची घटना समोर आली होती. इस्त्राईलने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय देशाला महागात पडला.

शाळेतील तब्बल 261 मुलं आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. तर जवळपास 6800 मुलांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. इस्त्राईलच्या शाळेतील 261 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.