Corona Vaccination: दोन डोस अपुरे ठरणार, बूस्टर डोसची गरज भासणार?; WHOनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 05:23 PM2021-06-21T17:23:03+5:302021-06-21T17:28:41+5:30

Corona Vaccination: जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली महत्त्वाची माहिती

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं कमी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरण अभियानाला वेग देण्याची गरज आहे.

आजपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण सुरू झालं आहे. काल देशात ५२ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला गती मिळणं आवश्यक आहे. मात्र कोरोना विषाणू नवं रुप धारण करत असल्यानं चिंता वाढली आहे.

देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे दुसरी लाट आली. आता हाच व्हेरिएंट म्युटेट झाला आहे. त्यामुळे डेल्टा प्लस तयार झाला असून तो रोगप्रतिकारशक्तीला चकवा देऊ शकतो अशी भीती वर्तवण्यात येत आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर एक बूस्टर डोस घेण्याबद्दल चर्चा सुरू असून काही कंपन्या यासाठी संशोधनदेखील सुरू केलं आहे.

कोरोना विषाणूच्या अधिक संक्रामक व्हेरिएंटवर बूस्टर शॉटनं निर्णायक वार करण्याच्या हेतूनं काही देश आणि काही औषध कंपन्या बूस्टर डोसवर काम करत आहेत. मात्र अशा कोणत्या बूस्टर डोसची गरज आहे का याबद्दल आताच भाष्य करणं घाईचं ठरेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज आहे की नाही याबद्दल आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.

'बूस्टर डोसच्या गरजेबद्दलची चर्चा फार आधीच सुरू झाली आहे. जगातील अनेक भागांमध्ये अद्याप गंभीर आजार असलेल्या लोकांनादेखील लसीचा पहिला डोस मिळालेला नाही,' असं स्वामीनाथन यांनी सांगितलं.

कोरोना व्हेरिएंटच्या विरोधात मिक्स डोस अधिक प्रभावी ठरू शकतो, असं स्वामीनाथन म्हणाल्या. आपल्या बहुतांश नागरिकांना पहिला डोस दिलेले देश मिक्स लसीचा पर्याय निवडू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.

हिवाळ्याच्या दिवसांत ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये लसीचा बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. यासाठी ब्रिटनमध्ये सात वेगवेगळ्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत.

ब्रिटन, स्पेन आणि जर्मनीमध्ये मिक्स अँड मॅच पद्धतीनं लसीकरण करण्यात आलं. या ठिकाणी लोकांना अधिक ताप आला. साईड इफेक्ट्सदेखील जास्त प्रमाणात दिसून आले.