Mucormycosis: ब्लॅक फंगसचा धोका कोणाला? लक्षणं, उपाय काय?; देशातील टॉप डॉक्टर्सनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 04:21 PM2021-05-21T16:21:06+5:302021-05-21T16:24:59+5:30

Mucormycosis: दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि मेदांता रुग्णालयाचे डॉ. नरेश त्रेहान यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना आता ब्लॅक फंगस आजाराचा धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत देशात ब्लॅक फंगसचे ५५०० हून अधिक रुग्ण आढळले असून पैकी सव्वाशे जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्लॅक फंगसचा धोका वाढत असल्यानं वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे. उपचारांसाठी आवश्यक असलेल्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यानं धोका आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील दोन टॉप डॉक्टर्सनी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे.

दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया आणि मेदांता रुग्णालयाचे डॉ. नरेश त्रेहान यांनी म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) संदर्भात आज विस्तृत बातचीत केली. यातून ब्लॅक फंगसची लक्षणं, त्यावरील उपाय याबद्दलची महत्त्वाची माहिती मिळाली.

मधुमेह असलेल्या आणि कोरोनावर मात केलेल्यांना ब्लॅक फंगसचा सर्वाधिक धोका आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांवर ब्लॅक फंगस हल्ला करतो. मधुमेहाचे रुग्ण स्टेरॉईड्सचा वापर करतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे ब्लॅक फंगसला हल्ला करण्याची संधी मिळते.

मधुमेहाच्या रुग्णांसोबतच कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या व्यक्ती आणि ट्रान्सप्लांट केलेल्या व्यक्तींना ब्लॅक फंगसचा अधिक धोका आहे. ब्लॅक फंगस मातीमध्ये असतो. रोगप्रतिकारशक्ती मजबूत असलेल्यांना यापासून धोका नाही, असं डॉ. नरेश त्रेहान यांनी सांगितलं.

कोरोना उपचारादरम्यान स्टेरॉईड्स देण्यात आलेल्या व्यक्तींना ब्लॅक फंगसचा अधिक धोका आहे. या व्यक्तींच्या रक्तीतील शर्करेचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांना असलेला धोका जास्त आहे. बऱ्याच कालावधीपासून स्टेरॉईड्स घेणाऱ्यांनादेखील ब्लॅक फंगस लक्ष्य करू शकतो.

ब्लॅक फंगसचा धोका टाळायचा असल्यास शरीरातील शर्करेचं प्रमाण वाढू देऊ नये. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या शरीरातील शर्करेचं प्रमाण कमी राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

मधुमेह नसलेल्या, पण नियमितपणे स्टेरॉईड्स घेणाऱ्यांनी सतत त्यांच्या शरीरातील शर्करेचं प्रमाण तपासून पाहावं. स्टेरॉईड्सचा वापर शक्यतो टाळावा. अतिशय गरज असल्यास कमीत कमी स्टेरॉईड्सचा वापर करावा.

ब्लॅक फंगसनं हल्ला केला आहे हे तपासून पाहण्यासाठी काही लक्षणं आहेत. तुमच्या नाकामध्ये त्रास होत असेल, डोकं दुखत असेल, चेहऱ्याचा एक भाग दुखत असेल किंवा तिथे सूज असेल, चेहरा सुन्न पडत असेल, चेहऱ्याचा रंग बदलत असेल, भुवयांकडील भाग सुजला असेल, दात हलू लागत असतील, तर तुमच्यावर ब्लॅक फंगसचा हल्ला झाला आहे.

औषधांच्या मदतीनं ब्लॅक फंगस आजार बरा होता. काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. चार ते सहा आठवडे औषधं घेतल्यानंतर ब्लॅक फंगस आजार बरा होता. मात्र स्वरुप गंभीर असल्यास तीन-तीन महिने उपचार घ्यावे लागतात.