Bheemeshvari Devi Mandir: मूर्ती एक अन् मंदिर दोन; अतिशय खास आहे महाभारत काळातील 'हे' मंदिर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 06:15 PM2022-07-01T18:15:40+5:302022-07-01T18:18:55+5:30

Haryana Bheemeshvari Devi Mandir: हरियाणातील झज्जर जिल्ह्यात वसलेले माता भीमेश्वरीचे मंदिर अनेक अर्थांनी अद्वितीय आहे. हे कदाचित जगातील एकमेव असे मंदिर असेल जिथे मूर्ती एक आहे पण मंदिरे दोन आहेत.

Bheemeshvari Devi Mandir: भारतात अनेक वैविध्यपूर्ण मंदिरे आहेत. यात हरियाणातील श्री माता भीमेश्वरी देवीच्या मंदिराचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार हे मंदिर महाभारत काळाशी संबंधित आहे. हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बेरी येथे असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे एक मूर्ती आहे पण मंदिरे दोन आहेत. या मंदिरात ठेवलेली मूर्ती पांडूपुत्र भीमाने आणल्याचे सांगितले जाते.

भीमाने पाकिस्तानातून मूर्ती आणली- असे मानले जाते की, जेव्हा महाभारत युद्ध सुरू होणार होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने भीमाला कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी पाठवले होते. कुल देवी हिंगलाज पर्वतावर (आता हा पर्वत पाकिस्तानात आहे) विराजमान होती.

भीम तिथे पोहोचला आणि कुलदेवीला त्याच्यासोबत चालण्याची विनंती केली. कुल देवी म्हणाली की, मला उचलून घे आणि जिथे सोडशील, त्यापेक्षा मी पुढे जाणार नाही. भीमाने हे मान्य केले आणि भीमाने देवीसह हिंगलाज पर्वत सोडला.

बेरीला राहिली देवी- चालत असताना भीम हरियाणातील बेरी गावातून जात होता, तिथे त्याने लघुशंकेला जाण्यासाठी कुलदेवीला खाली ठेवले. त्यानंतर देवीला पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला, पण देवी तेथून पुढे आलीच नाही. तेव्हापासून देवी बेरीमध्ये वास्तव्यास आहे.

यानंतर भीमाने बेरीमध्ये मंदिर बांधून मातेची स्थापना केली आणि कुरुक्षेत्राला निघून गेला. तेव्हापासून मंदिर श्री माता भीमेश्वरी देवी म्हणून ओळखले जाऊ लागले.

मूर्ती एक आणि मंदिर दोन असण्याचे कारण? माँ भीमेश्वरी देवीची मूर्ती एक असली तरी त्यासाठी दोन मंदिरे बांधण्यात आली आहेत. वास्तविक, आई रात्री आतील मंदिरात विसावते आणि दिवसा भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेरील मंदिरात बसते.

असे मानले जाते की आतील मंदिर हा ऋषी दुर्वासांचा आश्रम आहे, ऋषींनी आईला त्यांच्या आश्रमात येण्याची विनंती केली होती, म्हणून आई दररोज रात्री तेथे विश्रांती घेते. (डिस्केमर: येथे दिलेली माहिती नागरिकांकडून मिळालेल्या ऐकीव माहितीच्या आधारे आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.)