शिंदे गटाचे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदेंना धक्का बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 02:06 PM2022-09-24T14:06:35+5:302022-09-24T14:09:49+5:30

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात प्रामुख्याने मुंबई महापालिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता खाली खेचण्यासाठी भाजपा-शिंदे गट कामाला लागलेत. त्यात राजकीय नेत्यांची पळवापळवी सुरू आहे.

शिवसेनेतून शिंदे गटात आलेले स्टार प्रचारक सिनेअभिनेता दिगंबर नाईक हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं पुढे आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या सत्कार कार्यक्रमात दिगंबर नाईक उपस्थित राहिल्याने चर्चा सुरू झाली होती.

त्यानंतर दिगंबर नाईक यांनी माझे एकनाथ शिंदे यांच्याशी ३०-३५ वर्ष जुने संबंध आहेत. आपला माणूस मुख्यमंत्री होत असेल तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आलो. शिवसेनेत ९ वर्षापासून मी स्टार प्रचारक आहे. निवडणुकीत अनेक सभा गाजवल्या. शिंदे गटाला पाठिंबा देण्यापूर्वी मला शिवसेनेतून अनेक नेत्यांचे फोन आले होते असं त्यांनी म्हटलं.

त्यानंतर अवघ्या काही महिन्यात दिगंबर नाईक शिंदे गटात अस्वस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे. दिंगबर नाईक लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील असं बोलले जात आहे. अलीकडेच दिगंबर नाईक यांनी भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

दिगंबर नाईक मालवणी भाषेत गाऱ्हाणं घालण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे निकटवर्तीय मित्रदेखील आहेत. भाजपाच्या एका कार्यक्रमात दिगंबर नाईक यांनी उपस्थिती दर्शवत गाऱ्हाणे मांडले होते. त्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही तोंडभरून कौतुक केले होते.

शिवसेनेतून शिंदे गटात आलेले दिगंबर नाईक सध्या अस्वस्थ आहेत. त्यामुळे शिंदे गटात नाराजी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिगंबर नाईक हे शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते. त्याचसोबत निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून ते काम करायचे. मात्र तेच शिंदे गटात अस्वस्थ झाले असल्याचं कळतंय.

शिंदे गटाला पाठिंबा देताना दिगंबर नाईक म्हणाले होते की, एकनाथ शिंदे हे आपलेसे वाटणारे नेते आहेत. मी शिवसेनेतच आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची कास धरणारे आम्ही सगळे आहोत. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेतून मी शिवसेनेत आलो. त्यामुळे जिथे हिंदुत्व तिथे मी असेन असं दिगंबर नाईक यांनी म्हटलं होते.