Maharashtra Political Crisis: संजय राऊतांनाही शोधला पर्याय! आता ‘या’ २ तोफा धडाडणार; उद्धव ठाकरेंनी सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 08:32 AM2022-08-04T08:32:16+5:302022-08-04T08:36:23+5:30

Maharashtra Political Crisis: बंडखोरांना अद्दल घडवण्यासाठी सक्षम पर्याय शोधणाऱ्या उद्धव ठाकरेंवर संजय राऊत यांचाही पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. तर, शिवसेनेतील गळती थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असणार आहे. यासाठीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, पक्षातील गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यातच आता मुंबई महानगरपालिकेसह (BMC Election 2022) अनेक ठिकाणी निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करून शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह फुंकण्यासाठी काय काय केले जाऊ शकते. बंडखोरांना कोणते पर्याय सक्षमपणे उभे केले जाऊ शकतात, यावर भर दिला जात असून, पक्षातील विविध स्तरावरील पदाधिकारी नेते यांच्या बैठकांचे मोठे सत्र सुरू झाले आहेत. अनेकांना शिवसेना आणण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी सोपी नसणार असे सांगितले जात आहे.

शिवसेनेची सातत्याने बाजू मांडणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केल्याने त्यांच्याऐवजी आता खासदार अरविंद सावंत तसेच, आमदार नीलम गोऱ्हे यांच्यावर पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता पक्षाची पुढची भूमिका कशी असेल तसेच भाजपला शह देण्यासाठी काय रणनिती असायला हवी यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याचे समजते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने राज्याचा अपमान करत आहेत. त्यांच्याविरोधीत असंतोष आहे. तो असंतोष दडपण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. आम्ही प्रवक्ते आहोत, आता काही पोपट झालेत जे रोज काहीतरी बोलत असतात. मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांनी राज्याचा अपमान केला आहे. जाती-जातींमध्ये दुही पसरवण्याचे काम त्यांनी केले. याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना अटक झाली आणि मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न झाला. राऊत यांच्या अटकेमुळे महत्त्वाची बातमी झाकली गेली असे अरविंद सावंत म्हणाले.

सातत्याने काही भोंगे बोलतात. वाईट भाषेत बोलतात, ते भाजपला मान्य आहे, असे समजायचे का, यावर राऊत हे प्रचंड प्रमाणात हल्ले करीत होते. आम्हालाही या बाबत प्रतिहल्ले करता येतात. मात्र भाषा संभाळून वापरणे याबाबत पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केले आहे. आमच्या पक्षाचे सवंगडी आमच्या पाठीत सुरा खुपसून गेले. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला, महाराष्ट्र हळहळला. त्यासाठी नीतिमूल्ये लागतात, ती त्यांनी जपली असेही ते म्हणाले. वकील साळवे मूळ प्रश्नाला बगल देत असल्याचा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.

शिवसेनेचे पदाधिकारी अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंसोबत पक्षाची बैठक झाली, त्यात शेतकऱ्यांपासून ते अन्य सर्व विषयांवर चर्चा झाली. एखाद्या नेत्यावर हल्ला झाला तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, परंतु जी कलमे लावली गेली आहेत ती चुकीची आहेत, सरकार सूडाच्या भावनेने हे करत आहे. केदार दिघे यांच्यावरही खोटेपणातून आणि सूडभावनेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या अनुपस्थितीत अरविंद सावंत आणि निलम गोऱ्हे हे प्रमुख भूमिका बजावणार असून आम्ही सर्व तर आहोतच, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यापासून ते भाजपला तगडी टक्कर देण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. मात्र, ईडी कारवाईमुळे शिवसेनेची बाजू अतिशय भक्कमपणे मांडणारा समर्थ प्रवक्ता जेरबंद झाल्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर मोठीच अडचण होऊन बसली आहे. बंडखोरांना अद्दल घडवण्यासाठी सक्षम पर्याय शोधणाऱ्या उद्धव ठाकरेंवर संजय राऊत यांचाही पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. शिवसेनेची बाजू लावून धरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत आणि नीलम गोऱ्हे या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, एकीकडे आदित्य ठाकरे राज्यातील विविध भागांचे दौरे करत असताना उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी कोल्हापूर दौरा उरकल्यानंतर कार्ला गडावर येऊन आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. तेजस यांनी लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत शिवसेनेवर आलेले राजकीय विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली. तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय नसले तरी त्याने शिवसेना पक्ष संघटना व ठाकरे परिवारासाठी कार्ला गडावर येऊन देवीचे दर्शन व आशीर्वाद घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.