Narendra Modi Live: एकनाथ शिंदेंचं एक वाक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदी हसले अन् कार्यकर्त्यांनी दिली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 07:40 PM2023-01-19T19:40:47+5:302023-01-19T19:48:13+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्धाटन पार पडले. मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात येत होती. अपेक्षेप्रमाणे मोदींनी मुंबईच्या विकासकामांवर भाष्य करत अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबईत बीकेसीत झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदींचे तोंडभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगानं धाऊ शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे असं शिंदेंनी म्हटलं.

केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहेच, येणाऱ्या काही दिवसात महापालिका निवडणुका होतायत, तेव्हा विकासाचे हे डबल इंजिन 'ट्रिपल इंजिन' होणार आहे, आमच्यावरील टीकेला आम्ही कामानं उत्तर देऊ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात केलेल्या एका वाक्यानं संपूर्ण मैदान दणाणून निघाले. कार्यकर्त्यांनी जोरजोरात मोदी-मोदी नावाचा गजर केला. तर एकनाथ शिंदे यांच्या विधानानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह व्यासपीठावर सगळ्याच नेत्यांमध्ये हशा पिकला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा मी दावोस दौऱ्यावर गेलो होतो. दावोसमध्ये विविध देशाचे लोक आले होते. पंतप्रधान, अध्यक्ष, मंत्री होते. हे सगळे आपल्या देशाचे आणि पंतप्रधानांचे कौतुक करत होते. मलाही या भेटीत अनेक लोक भेटले.

हे लोक फक्त आणि फक्त मोदींबद्दल विचारायचे. एका पंतप्रधानांनी मला सांगितले. मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत त्यांनी फोटो काढला आणि म्हणाले हा फोटो मोदींना दाखवा. जर्मनचे, सौदीचे लोक मला म्हणाले तुम्ही मोदींसोबत आहात ना, तर मी म्हटलं आम्ही त्यांची माणसं आहोत असं शिंदेंनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी भाषणात हे वाक्य उच्चारताच मैदानात मोदी-मोदी नावाचा गजर झाला. पंतप्रधान मोदींसह व्यासपीठावर नेत्यांमध्ये हशा पिकला. दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा डंका ऐकायला मिळतो हा आपला गौरव आहे असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

या भाषणात शिंदे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास ठप्प झाला होता, लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता. त्यातून या राज्याची आणि जनतेची सुटका करण्याची भाग्य मला मिळाले ते मोदींच्या सारख्या धाडसी नेत्यामुळेच असं सांगताच मैदानात टाळ्यांच्या कडकडाट झाला.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांचे जिव्हाळ्याचे असे नाते होते. हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा अभिमान हा या दोघांच्याही विचारांचा समान धागा होता आणि विकासाचे राजकारण हा पाया होता. तेच सुत्र धरुन अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना मुंबईत आमंत्रित केले आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

त्याचसोबत इच्छाशक्ती दाखवल्यामुळे मुंबईतील अनेक प्रकल्प मार्गी लागतायेत. ४५० किमी रस्ते सिमेंट क्रॉकिंटचे होणार आहेत. दोन अडीच वर्षात संपूर्ण मुंबई खड्डेमुक्त होईल आणि लोकांचे जीवन सुसज्ज होईल. काही लोक खोडा घालण्याचं काम करतायेत. त्यांना ते काम करू द्या असं सांगत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.