बंडखोर आमदार मुंबईत परतणार, अविश्वास प्रस्तावाची तयारी?; वाचा १० मोठ्या घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:38 PM2022-06-28T16:38:30+5:302022-06-28T16:44:47+5:30

बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आम्हीच मूळ शिवसेना आहोत. पक्षाच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची साथ सोडा, भाजपासोबत युती करा अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या ठाण्यातील माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी याबाबत पत्रक काढले आहे. शिंदे समर्थनार्थ काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शनात मिनाक्षी शिंदे सहभागी होत्या.

मुंबईत येण्याबाबत शिवसेनेचे बंडखोर आमदार सरवणकर म्हणाले की, जेव्हा गरज असेल तेव्हा येऊ. येत्या एक-दोन दिवसांत तो मुंबईला येऊ शकतो. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत अशी भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली आहे.

त्याचवेळी भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्याची बातमी समोर आली. त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार महेश जेठमलानी यांच्यासोबत दिसले. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीवर दिल्लीत खलबतं सुरू असल्याचं दिसून येते.

शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना आवाहन केले आहे. आमचा संयम सुटत चालला आहे. दिल्लीतील भाजपा नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी बोलावी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने व्हावेत अशी इच्छा आहे असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.

त्याचसोबत कुठेतरी भाजपा-शिवसेनेचं वितुष्ट संपवावं, शेवट गोड व्हावा. भाजपाचे प्रमुख मोदीजी तुम्हाला लहान भाऊ मानतात. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला असं आवाहन केसरकरांनी केले आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आमदारांना आवाहन केले.

आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही उद्धव ठाकरेंनी सांगितले

तसेच आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

या सगळ्या घडामोडीत शिंदे गटाकडून महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढणार असल्याची माहिती समोर आली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको असं सांगत सरकारनेच विश्वासदर्शक ठराव आणावा असं शिंदे गटाने सांगितले.

तर उद्धव ठाकरे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्यानंतर कॅबिनेटमध्ये ठाकरे राजीनामा देतील अशी बातमी समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.