CoronaVirus Updates: देशात नव्या ३७ हजार १५४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 10:29 AM2021-07-12T10:29:40+5:302021-07-12T10:40:05+5:30

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०० लाख १४ हजार ७१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशभरात गेल्या २४ तासांत ३७ हजार १५४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७२४ जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०८ लाख ७४ हजार ३७६ वर पोहचली आहे. देशात सध्या ४ लाख ५० हजार ८९९ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ३९ हजार ६४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच देशभरात आतापर्यंत ३ कोटी ०० लाख १४ हजार ७१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाही अजून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत.

राज्यात रविवारी ८ हजार ५३५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ६ हजार १३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत ५९,१२,४७९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के इतके झाले आहे.

आज नांदेड आणि भंडारा जिल्ह्यात सगल दुसऱ्या दिवशी एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळेलेला नाही. त्यामुळे नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर हिंगोली, यवतमाळ, गोंदिया, धुळे या जिल्ह्यांमध्ये १ ते ३ अश्या संख्येत रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

मुंबईत रविवारी कोरोनाबाधित १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५५ नोंदविण्यात आली आहे, तर कोरोनामधून ६६६ रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या शून्य आहे.

मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १२ जणांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ११ पुरुष रुग्ण होते, तर ४ महिला होत्या. ३ रुग्ण ४० वर्षांखालील होते. १० रुग्ण ६० वर्षांवरील होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटांतील होते. मुंबईत ३४ हजार ९८० चाचण्या करण्यात आल्या असून, बरे झालेल्या रुग्णांचा प्रमाण ९६ टक्के आहे. ४ ते १० जुलैदरम्यान कोविड वाढीचा दर ०.०७ टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा दर ९२८ दिवस आहे. सक्रिय कंटेनमेंट झोन ५ असून, सक्रिय सीलबंद इमारती ६८ आहेत.