Omicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 01:01 PM2021-12-05T13:01:23+5:302021-12-05T13:06:09+5:30

Omicron News: ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; आतापर्यंत ५ जणांना लागण, महाराष्ट्रात एक पॉझिटिव्ह

कर्नाटक, गुजरातनंतर महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. डोंबिवलीमधील एका ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील लोकांची चिंता वाढली आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम आफ्रिकेत आढळून आला. आता ३ डझनपेक्षा अधिक देशांत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. आतापर्यंत कर्नाटकात ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

डोंबिवलीत ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणामध्ये सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीत आढळलेला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि दिल्लीमार्गे २३ नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाला. आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले, की हा रुग्ण चारजणांसोबत मुंबईत दाखल झाला. त्यांचा शोध सुरु आहे. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये आहे.

एप्रिलपासून जहाजावर असल्याने त्याला लस घेता आली नव्हती. भारतात परततानाच त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे लसीची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानं अनेकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. जवळपास ९० लाख लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर अँटिबॉडी तयार होतात. त्यामुळे दोन्ही डोस घेणं अतिशय गरजेचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेकांनी दुसरा डोस घेण्याचं टाळलं. मात्र कोरोनापासून बचाव करायचा असल्यास दोन्ही डोस गरजेचे आहेत.

एका बाजूला ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना दुसऱ्या बाजूला देशानं लसीकरण मोहिमेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. देशातील पात्र लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं.

कोरोना प्रतिबंधात्मक लस विषाणूपासून पूर्ण संरक्षण देत नाही ही बाब खरी आहे. मात्र लस घेतली असल्यास रुग्णालयात दाखल होणं टाळता येतं, घरच्या घरी उपचार घेऊन बरं होता येतं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष करता कामा नये.