Coronavirus : धक्कादायक आकडेवारी! देशात कोरोनामुळे मृत पावणारा दर दुसरा रुग्ण महाराष्ट्रातला; तिसरा मुंबईचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:21 PM2020-04-14T15:21:02+5:302020-04-14T15:51:13+5:30

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 10000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले असून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 10,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मंगळवारी 2455 वर पोहोचली आहे. मुंबईत 92, नवी मुंबईत 13, रायगडमध्ये 1, ठाण्यात 10, वसई-विरारमध्ये 5 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्र आणि मुंबईतील असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

देशात कोरोनामुळे मृत पावणारा दर दुसरा रुग्ण महाराष्ट्रातील, तिसरा मुंबईतील असल्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सोमवारी (13 एप्रिल) महाराष्ट्रात कोरोनाचे 352 नवे रुग्ण आढळले त्यातील 242 हे मुंबईतील आहेत. तर एकूण 11 जणांचा मृत्यू झाला त्यापैकी 9 जण हे मुंबईचे असल्याची माहिती मिळत आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अत्यंत वेगाने कोरोनाचा हॉटस्पॉट बनत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही खूप वेगाने वाढत असून ही परिस्थिती गंभीर आहे

वांद्रे ते दहिसर पूर्व अशा विस्तीर्ण पसरलेल्या व सुमारे 65 लाख लोकवस्ती असलेल्या पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. तसेच धारावीतील रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे आता 71 हून अधिक रुग्ण झाले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रात सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत.

नागरिक विनाकारण किराणा, भाजी व फळे विकत घेण्यासाठी बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी सोशल सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजले असून सामान खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना वेसण कशी घालायची हा पोलीस यंत्रणा व पालिका प्रशासनासमोर मोठा प्रश्न आहे. राज्यात सर्व खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत.

कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी लोकल, मेट्रोसह रेल्वेसेवा 3 मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांचं स्क्रिनिंग आणि टेस्टिंग केलं जातं आहे.

कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशात युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लागली असून सर्व राज्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे.

शासनाकडून अनेक ठिकाणी सुविधा केंद्र निर्माण करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी हॉस्टेल, हॉटेल, शाळा, स्टेडीयम, लॉज या सार्वजनिक ठिकाणी यांची स्थापना केली जात आहे.

सुविधा केंद्रावर ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षण जाणवत असतील म्हणजेच श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा अन्य शारीरीक लक्षणं दिसून येत असतील तर रुग्णांची व्यवस्था केली जात आहे. तसेच त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.

वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 119,718 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,925,528 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 452,177 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.