काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

By अतुल कुलकर्णी | Published: April 29, 2024 02:27 AM2024-04-29T02:27:28+5:302024-04-29T02:28:23+5:30

सुनील दत्त, मुरली देवरा, रजनी पटेल, गुरुदास कामत ही मंडळी मुंबई काँग्रेसमध्ये होती. प्रदेश काँग्रेसइतकाच मुंबई काँग्रेसचाही दबदबा होता.

lok sabha election 2024 An opportunity for Congress to open an account in Mumbai for the Lok Sabha after almost ten years | काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

अतुल कुलकर्णी

मुंबई : गेल्या दहा वर्षांत मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी एकही जागा काँग्रेसला जिंकता आलेली नाही. यावेळी काँग्रेसला महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या दोन लोकसभेच्या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यापैकी मुंबई उत्तर मध्यमधून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि दोन वेळा मुंबईतून लोकसभेवर निवडून आलेल्या एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांना पक्षाने संधी दिली आहे. मुंबई उत्तरमधून अद्याप काँग्रेसला उमेदवार मिळालेला नाही. त्या ठिकाणाहून अभिनेता सोनू सूद यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे.

सुनील दत्त, मुरली देवरा, रजनी पटेल, गुरुदास कामत ही मंडळी मुंबई काँग्रेसमध्ये होती. प्रदेश काँग्रेसइतकाच मुंबई काँग्रेसचाही दबदबा होता. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे मुंबईत असतानाही काँग्रेसने मुंबईत दमदार यश मिळवले होते. २००५ आणि २००९ या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवले होते. २००५ मध्ये मोहन रावले वगळता सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. २००९मध्ये संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले. उरलेल्या पाचही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. पण, २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसला मुंबईतून उतरती कळा लागली. या दोन्ही निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी तीन जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला औषधालाही जागा जिंकता आली नाही. दरम्यान, पुलाखालून बरेच पाणी गेले. आता महाविकास आघाडी म्हणून उध्दवसेना आणि काँग्रेस एकत्र आहेत.

यावेळी काँग्रेसने मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. दोन वेळा निवडून येणाऱ्या पुनम महाजन यांना भाजपाने यावेळी संधी दिलेली नाही. त्यांच्याऐवजी  ॲड. उज्वल निकम यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केली आहे. नसीम खान यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता दिसत असल्यामुळे भाजपने ॲड. निकम यांना याच मतदारसंघातून तयार ठेवले होते. २६/११च्या खटल्यात निकम यांनी बजावलेली कामगिरी आणि नसीम खान यांची काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली तर त्यातून मतांचे ध्रुवीकरण करण्याची योजना गायकवाड यांच्या उमेदवारीने बारगळली.

उत्तर मध्य मुंबईत २०१९मध्ये पुनम महाजन १,३०,००५ मतांनी निवडून आल्या होत्या. या लोकसभा मतदारसंघातल्या ६ विधानसभा मतदारसंघांपैकी विलेपार्ले पराग अळवणी, वांद्रे पश्चिम आशिष शेलार हे २ आमदार भाजपचे आहेत, तर चांदिवलीचे दिलीप लांडे आणि कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर हे सध्या शिंदेसेनेत आहेत. वांद्रे पूर्वमधील झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार गटासोबत घरोबा केला आहे. कलिनाचे संजय पोतनीस हे उद्धवसेनेचे आमदार आहेत. या मतदारसंघात आज तरी काँग्रेसचा एकही आमदार नाही. पण, नुकतेच राज्यसभेवर निवडून आलेले चंद्रकांत हंडोरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. मी पहिल्यांदा वर्षा गायकवाड यांच्या निमित्ताने काँग्रेसला मतदान करणार, अशी जाहीर घोषणा उद्धव ठाकरे यांनी नुकतीच केली आहे. वर्षा गायकवाड यांना मानणारा मोठा समाज या मतदारसंघात आहे. या मतदारसंघात एकूण १६ लाख ८१ हजार मतदारांपैकी ५,६७,१०० मराठी भाषिक, ४,२७,१०० मुस्लिम समाजाचे, तर ७७,३०० ख्रिश्चन समाजाचे मतदार आहेत.

त्यामुळे दहा वर्षानंतर का होईना वर्षा गायकवाड यांना मुंबईतील सहापैकी लोकसभेच्या एका जागेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याची संधी चालून आली आहे. उद्धवसेनेच्या बळावर हे घडू शकते. मात्र, त्यासाठी गायकवाड यांना नाराज नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोट बांधावी लागेल. मराठी मतदारांना साद घालावी लागेल. नाराज नसीम खान आपले भाऊ आहेत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले असले तरी नसीम खान प्रचारात उतरायला हवेत, तरच त्यांना हे यश मिळवता येईल.

पुनम महाजन यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे एक वर्ग नाराज आहे. पुनम महाजन प्रचारात उतरण्याची शक्यता दिसत नाही. पराग आळवणी विलेपार्ले मतदारसंघापुरते मर्यादित आहेत. या मतदारसंघातल्या फनेल झोनचा प्रश्न शेलार आणि अळवणी यांच्या वादात भाजपासाठी डोकेदुखी बनला आहे.  शिंदेसेनेचे आमदार किती मनापासून मैदानात उतरतील, यावरही या मतदारसंघाची गणिते अवलंबून आहेत.

Web Title: lok sabha election 2024 An opportunity for Congress to open an account in Mumbai for the Lok Sabha after almost ten years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.