चंद्रशेखर बावनकुळेंनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट; नातवाशी PMच्या रंगल्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 07:56 PM2022-09-03T19:56:33+5:302022-09-03T20:01:36+5:30

PM मोदींनी गणपती बाप्पाच्या मूर्तीची भेट स्वीकारत आवर्जून संपूर्ण कुटुंबाची केली विचारपूस

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली. प्रदेशाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदींशी ही पहिलीच भेट होती.

नौदलाच्या ध्वजामध्ये परिवर्तन करून महाराष्ट्राचा गौरव वाढविल्याबद्दल बावनकुळे यांनी यावेळी पंतप्रधानाचे आभार मानले. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे प्रतिक असलेल्या शिवमुद्रेचे रूप नौदलाच्या प्रतीक चिन्हाला प्रदान करण्यात आले आहे याचा आवर्जून उल्लेख श्री बावनकुळे यांनी या भेटीत केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील पक्ष बळकटीसाठी करीत असलेल्या कामांची माहिती दिली. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार दमदारपणे जनकल्याणाचे काम करीत असून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणासह राज्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते देखील हातभार लावत असल्याचा माहिती बावनकुळे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षकार्यासाठी मार्गदर्शन केले. शेतकरी, गरीब व दुर्बल घटकातील नागरिक व कुटुंबाच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.

श्रीगणेश प्रतिमेची दिली भेट- महाराष्ट्रात गणेशोत्सवात साजरा होत असताना या पंतप्रधान मोदीजी यांची सहकुटुंब भेट घेण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने बावनकुळे कुटुंबीयांनी श्रीगणेशाची मूर्ती पंतप्रधानांना सस्नेह भेट दिली. यावेळी बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे, मुलगी पायल आष्टणकर व नातू अधिराज आष्टणकर, चिरंजीव संकेत, सून अनुष्का असे कुटुंब त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदी यांनी बावनकुळे कुटुंबाची विचारणा केली.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने मला विलक्षण ऊर्जा मिळाली. तिचा उपयोग महाराष्ट्रातील ९७ हजार बूथवर पक्ष मजबूत करण्यासाठी करेन. कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते या सर्वांच्याच सहकार्याने पक्ष बळकटीसाठी मी सतत प्रयत्नरत राहीन, असा शब्द मी PM मोदींना दिला आहे", असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.