निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 01:03 PM2024-05-13T13:03:09+5:302024-05-13T13:06:05+5:30

निलेश लंके यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं.

BJP leader Radhakrishna Vikhe Patil criticizes ncpsp Nilesh Lanke and Sharad Pawar | निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल

Ahmednagar Lok Sabha ( Marathi News ) : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंके यांचे आव्हान आहे. प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत होत्या. आता मतदानाच्या दिवशीही हा राजकीय कलगीतुरा सुरू असून सुजय विखे यांचे वडील आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

"निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ आहे. जे दाखवलं जात होतं, ते वास्तव नाही. खरं वास्तव जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे, आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. मात्र असं असली तरी निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढवावी लागते. सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सोशल मीडियातून एक वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आता खरा चेहरा लोकांसमोर आला आहे," असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

शरद पवारांवरही निशाणा

निलेश लंके यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. "निलेश लंके यांचा चेहरा हा झुंडशाहीचा, गुंडशाहीचा, हप्तेखोरीचा आहे. शरद पवार यांनीही असेच लोक आयुष्यभर सांभाळले आहेत. जनतेचा विश्वाघात करून त्यांनी कायम सत्तास्थानं मिळवली आहेत," असं विखे यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, "विरोधी उमेदवाराला स्वत:बद्दल सांगण्यासारखं काहीही राहिलं नाही. त्यामुळे आमची बदनामी केली जात आहे. आपली गुंडगिरी, हप्तेखोरी, परप्रांतीयांना एमआयडीसीमध्ये नोकरीत प्राधान्य, हे सगळं पाप झाकण्यासाठी त्यांच्याकडून आमच्यावर पैसे वाटल्याचे आरोप केले जात आहेत," असा पलटवारही राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.

Web Title: BJP leader Radhakrishna Vikhe Patil criticizes ncpsp Nilesh Lanke and Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.