आषाढी एकादशी: जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल... पाहा विठुरायाचं मनमोहक रूप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 07:54 AM2021-07-20T07:54:25+5:302021-07-20T08:01:08+5:30

Ashadhi Ekadashi : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभारा सजला फुलांनी. पाहा लाडक्या विठुरायाचं मनमोहक रूप.

आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाले होते.

यंदा आषाढी एकादशीची महापूजा ही वारकऱ्यांविनाच पार पडली. खरं तर गेली अनेक शतकं वारीची परंपरा मात्र कोरोनाचं संकटामुळे मागील दोन वर्षापासून ही परंपरा खंडित झाली.

लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित येणाऱ्या माऊलींच्या पादुका यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरात दाखल झाल्या. यावेळी मोजके वारकरी या पालख्यांसोबत होते.

आषाढी एकादशीनिमित्त आज २० जुलै २०२१ रोजी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली.

पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात झाली होती. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो.

मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना हा मान मिळाला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला.

महापुजेला मुख्यमंत्र्यांसोबतच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे उपस्थित होते.

शासकीय पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आम्हाला आषाढी यात्रेत तुडुंब भरलेले पंढरपूर पाहायला मिळाले आहे. ते वातावरण आम्हाला परत पाहिजे. हे विठ्ठला... पांडुरंगा कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर...आम्हाला ते पूर्वीचे आषाढीतील वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले पंढरपूर पहायचंय अशी हाक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात घातली.