पैसा वसुल! सलग १२२ वर्ष पेटतोय जगातील सर्वात जुना बल्ब, कोणत्या कंपनीचा? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 04:35 PM2023-02-20T16:35:10+5:302023-02-20T16:39:30+5:30

एक बल्ब सतत दोन किंवा तीन वर्षे टिकतो हे फारच दुर्मिळ आहे. पण आज आपण एका अशा बल्बबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जो एक-दोन वर्षांपासून नव्हे तर तब्बल १२२ वर्षांपासून सतत जळत आहे. तो अजूनही खराब झालेला नाही.

इलेक्ट्रिक बल्बचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला होता. खरंतर एडिसन यांच्या खूप आधी शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी विजेच्या दिव्यांचा संशोधनाला सुरुवात केली होती. या सर्व कामांच्या आधारावर एडिसनने यांनी इलेक्ट्रिक बल्बचे सुधारित स्वरूप विकसित केले. नवा बल्ब सादर केला आणि त्याचं पेटंट घेतलं. आज बाजारात अनेक प्रकारचे बल्ब उपलब्ध आहेत.

कॅलिफोर्नियातील लिव्हरमोर शहराच्या अग्निशमन केंद्रात असा बल्ब आहे, जो १९०१ मध्ये पहिल्यांदा लावला गेला होता आणि तेव्हापासून आजतागायत हा बल्ब जळत आहे. हा बल्ब सेंटेनियल बल्ब म्हणून ओळखला जातो. हा बल्ब शेल्बी इलेक्ट्रॉनिक कंपनीने बनवला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वायर बदलण्यासाठी हा बल्ब १९३७ मध्ये पहिल्यांदा बंद करण्यात आला होता. वायर बदलल्यानंतर पुन्हा बल्ब पेटला. या बल्बचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. या बल्बवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.

सेंटेनियल बल्ब चार वॅट ऊर्जा वापरतो आणि २४ तास जळत असतो. सन २००१ मध्ये, सेंटेनियल बल्बचा १०० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्यामध्ये म्युझिक पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते.

हा वंडर बल्ब पाहण्यासाठी लोक दूर दूरहून या फायर स्टेशनवर येतात. कधी कधी तर इतकी गर्दी होते की अग्निशमन केंद्र एखाद्या संग्रहालयासारखं वाटतं. २०१३ मध्ये एकदा हा बल्ब आपोआप बंद झाला. बल्ब फ्युज झाला असावा, असे लोकांना वाटले, मात्र तपासणीनंतर वायरमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आलं होतं. वायर बदलण्यात आली आणि बल्ब पुन्हा पेटू लागला.