सिंथिया डी रिची आणि वादाचं जुनं नातं; बेनझीर भुट्टो यांच्यावरही आक्षेपार्ह भाष्य केलं होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 07:54 AM2020-06-09T07:54:01+5:302020-06-09T08:09:59+5:30

पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रेहमान मलिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या अमेरिकन महिला सिंथिया डी रिची आणि वादाचे जुने नाते आहे.

सिंथिया डी रिची यांनी आपल्या एका ब्लॉगमध्ये माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाष्य केले होते. त्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात अनेक एफआयआर दाखल केले होते.

पाकिस्तानमध्ये सिंथिया डी रिची यांच्याविरोधात फेडरल इन्व्हेस्टीगेशन एजन्सी तपास करत आहे. यानंतर सिंथिया डी रिची यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या माजी नेत्यांवर गंभीर आरोप केले.

2011मध्ये माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते रेहमान मलिक यांनी बलात्कार केल्याचा आरोप सिंथिया डी रिची यांनी केला आहे.

तसेच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी आणि तत्कालीन आरोग्यमंत्री मखदूम शहाबुद्दीन यांच्यावरही शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

याचबरोबर, सिंथिया डी रिची यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून मला धमक्या दिल्या जात असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे असल्याचा दावा केला असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सरकार होते. त्यामुळे हा घडलेला प्रकार सर्वांसमोर आणता आले नाही, असेही सिंथिया डी रिची यांनी म्हटले आहे.

सिंथिया डी रिची या स्वत:ला पाकिस्तान प्रेमी, Adventurer, फिल्म निर्माती असल्याचा दावा करतात. बऱ्याच वर्षांपासून त्या इस्लामाबादमध्ये राहत आहेत.

सुरुवातीच्या काळात पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्यांशी सिंथिया डी रिची यांचे चांगले संबंध होते. मात्र, नंतर परिस्थिती बिघडत गेली. नुकतेच त्यांनी एकामागून एक ट्विट करून पाकिस्तान पीपल्स पार्टीवर निशाणा साधला आहे.