Russia-Ukraine War: युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? पुतीन सिक्रेट बंकरकडे रवाना; रशियन विमानांच्या मोठ्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:37 PM2022-03-30T13:37:39+5:302022-03-30T13:41:34+5:30

Russia-Ukraine War: पुतीन यांनी आपली सारी शक्ती एकाच ठिकाणी ठेवलेली नाही. त्यांनी आपले अधिकारी, मंत्री वेगवेगळ्या ठिकाणच्या बंकरमध्ये ठेवले आहेत. . पुतीन यांच्या विमानांची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.

युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याला आता महिना झाला असला तरी युक्रेन पडलेले नाही. यामुळे पुतीन कमालीचे अस्वस्थ असून झेलेन्स्कींनी पाठविलेले पत्र त्यांनी केराच्या टोपलीत टाकून देत कायमचे उद्ध्वस्त करण्याचे वक्तव्य केले आहे. यानंतर पुतीन लगेचच अण्वस्त्रांपासून सुरक्षित अशा सिक्रेट बंकरमध्ये गेल्याचे वृत्त आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

पुतीन अण्वस्त्रांच्या तैनातीची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यानी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला केला तर नाटो देश रशियावर हल्ला करण्याची शक्यता आहे. यामुळे पुतीन सुरक्षित अशा बंकरमध्ये गेल्याचे सांगितले जात आहे.

ब्रिटिश वृत्तपत्र सनचे पत्रकार ख्रिस्टो गोजेव यांनी हा दावा केला आहे. रशियाचे राष्ट्रपती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची विमाने एकाच भागात जास्त जाऊ लागली आहेत. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवल्यावर पुतीन हे पश्चिमी सायबेरियाच्या सुरगुट भागात गेले असल्याचे लक्षात येते.

गेल्या काही दिवसांपूर्वी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू रहस्यमयीरित्या गायब झाल्याचे वृत्त आहे. त्यांना पुतीन यांच्याशी वाद झाल्याने हार्ट अॅटॅक आल्याचेही सांगितले जात आहे. परंतू त्यांची मुलगी क्‍सेनिया शोइगू ही गेल्या काही दिवसांत बऱ्याचदा यूराल पर्वतरागांकडे गेली आहे. यामुळे हे मंत्री ऊफाच्या बंकरमध्ये असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.

क्‍सेनियाचे काही फोटो हल्ली समोर आले आहेत. ती उफामध्ये असल्याचे दिसत आहे. रशियाच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलीने तिचे इंस्टाग्राम अकाउंट लॉक केले असून त्यात ती युक्रेनच्या निळ्या आणि पिवळ्या रंगात दिसली होती, असा दावाही युक्रेनने केला होता.

'मला खात्री आहे की शोइगु बंकरमध्ये आहेत,' असे ग्रोजेव्ह यांनी म्हटले आहे. कारण उफाकडे अनियमित विमानांची उड्डाणे झाली आहेत. यावरून संशय बळावत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पुतीन यांनी आपली सारी शक्ती एकाच ठिकाणी ठेवलेली नाही. त्यांनी आपले अधिकारी, मंत्री वेगवेगळ्या ठिकाणच्या बंकरमध्ये ठेवले आहेत. पुतीन यांच्या विमानांची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. यामुळे ते कुठे गेलेत याची माहिती मिळत नाहीय. मात्र ते सुरगुटला गेल्याचे सांगितले जात आहे.

सुरगुट ही रशियाची तेल राजधानी आहे आणि राजधानी मॉस्कोपासून ते 2900 किमी अंतरावर आहे. गोजेव म्हणाले, 'असे दिसते की शेवटचा टप्पा अत्यंत गुप्त आहे आणि तेथे एक विशेष बंकर असण्याची शक्यता आहे जिथे उच्च सरकारी अधिकारी आहेत.'