Imran Khan Pakistan : इम्रान खान पाकिस्तानला कर्जाच्या ओझ्याखाली बुडवणार? सौदी अरेबियानं ४ टक्के व्याजानं दिले ३ अब्ज डॉलर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 04:56 PM2021-12-05T16:56:08+5:302021-12-05T17:08:51+5:30

सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली आहे. देश चालवण्यासाठी त्यांना अनेक देशांकडे कर्ज मागावं लागत आहेत.

सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली आहे. देश चालवण्यासाठी त्यांना अनेक देशांकडे कर्ज मागावं लागत आहेत. आर्थिक डबघाईतून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियाकडून तीन अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं आहे.

आर्थिक मदतीच्या रुपात शनिवारी पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून तीन अब्ज डॉलर्सची रक्कम देण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासंदर्भातील माहिती दिली. आपल्या बुडत्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी पाकिस्ताननं सौदी अरेबियाकडून मदत मागितली होती. ही त्यापैकीच असलेली रक्कम आहे. परंतु सौदी अरेबियानंदेखील पाकिस्तानला ४ टक्के व्याजानं ही रक्कम दिली आहे.

आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानला (Pakistan) लवकरच सौदी अरेबियाकडून तीन अब्ज डॉलर्सचं कर्ज मिळणार आहे. यादरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळानं (Imran Khan Cabinet) ही रक्कम देशाच्या केंद्रीय बँकेत ठेवण्यास सहमती दिली होती.

इम्रान खान यांच्या हाती पंतप्रधानपदाची धुरा गेल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अधिक बिकट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या स्टेट बँकेनं जी आकडेवारी सादर केली, त्यानंतर संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे.

रियाद दौरा आणि युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी इम्रान खान यांनी चर्चा केली होती. त्यांच्या चर्चेनंतर एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीनंर त्यांना ही रक्कम मिळाली आहे.

चर्चेनंतर सौदी अरेबियानं पाकिस्तानला ४.२ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत देण्यासाठी होकार दिला होता. त्यापैकी ३ अब्ज डॉलर्सची रक्कम पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेत स्थानांतरीत करण्यात येणार होती.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला सौदी अरेबियाकडून तीन अब्ज डॉलर्सची रक्कम मिळाली असल्याची माहिती इम्रान खान यांचे आर्थिक आणि महसूल विषयाचे सल्लागार शौकत तरीन यांनी दिली.

आम्ही क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि सौदी अरेबियाचे आभार मानतो असं ट्वीट शौकत तरीन यांनी केलं. दरम्यान, रॉटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानला हे कर्ज ४ टक्के व्याजदरानं देण्यात आलं आहे. तसंच यासाठीच्या अटी शर्थींवर पाकिस्तानकडून मागील महिन्यात स्वाक्षरी करण्यात आली होती.

पाकिस्तान सरकारचा असा विश्वास आहे की या करारामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा मजबूत होईल आणि कोरोना विषाणूमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई होईल. सदोन्ही देशांमधील दृढ संबंध असं पाकिस्ताननं या मदतीचं वर्णन केलं आहे. यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध आणखी वाढतील, असंही त्यांनी म्हटलं.