Pakistan News : आपले खायचे वांदे, भारताची तुर्कस्थानला मदत पाहून शहबाज शरीफ यांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 08:43 PM2023-02-13T20:43:07+5:302023-02-13T20:56:45+5:30

येत्या काही दिवसांत पाकिस्तान रस्ते आणि सागरी मार्गाने १६०० टन रेशन तुर्कस्थान आणि सीरियाला पाठवणार असल्याचेही शरीफ म्हणाले.

तुर्कस्थान आणि सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या आता ३३ हजारांवर गेली आहे. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदत पाठवून पाकिस्तान मदत करत राहील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी रविवारी सांगितले. तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या निधीचा वापर सीरियातील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठीही केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

पीएम शरीफ यांनी तुर्कस्थान आणि सीरियातील भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असलेल्या मदत प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषवले असल्याची माहिती पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाच्या मीडिया विंगने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार, नियोजन मंत्री अहसान इक्बाल, माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब आणि उच्च पाकिस्तानी अधिकार्‍यांना संबोधित करताना पंतप्रधान शरीफ म्हणाले की तुर्कस्थान आणि सीरियाला मदत सामग्री पुरवण्याचा सर्व खर्च पाकिस्तान उचलेल.

पाकिस्तानचे वृत्तपत्र पाकिस्तान टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भूकंपग्रस्तांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व आवश्यक वस्तू खरेदी करण्याचे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (NDMA) दिले आहेत. पाकिस्तान तुर्कस्तानला मदत करण्यासाठी हवाई मार्ग तसेच रस्ते आणि सागरी मार्गाचा वापर करत असल्याचेही त्यांनी म्हटल्याचे यात नमूद करण्यात आलेय.

यादरम्यान शहबाज शरीफ यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले की, सीरिया आणि तुर्कीच्या मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी मोहीम सुरू करावी, ज्यामध्ये शैक्षणिक संस्थांशीही मदतीसाठी संपर्क साधावा. त्यांनी धार्मिक प्रकरणांच्या मंत्रालयाला उलेमांच्या मदतीने धार्मिक संस्थांमध्ये जनजागृती आणि निधी गोळा करण्यासदेखील सांगितले.

पाकिस्तानने विशेष टेंट, ब्लँकेट, रजाई आणि हिवाळ्यासाठी उबदार कपड्यांसह मदत सामग्रीची मोठी खेप हवाईमार्गे तुर्कस्थानला पाठवली आहे. रविवारी पाकिस्तानने दोन्ही देशांकडे २१ ट्रक मदत सामग्री पाठवली होती. येत्या काही दिवसांत पाकिस्तान रस्ते आणि सागरी मार्गाने १६०० टन रेशन तुर्कस्थान आणि सीरियाला पाठवणार असल्याचेही शरीफ म्हणाले.

तुर्कस्थानमध्ये भूकंप झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान शरीफ तुर्कस्थानला जातील आणि पीडितांप्रती शोक व्यक्त करतील, अशी घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आली. मात्र संभाव्य भेटीच्या दिवशी शहबाज शरीफ यांनी आपला दौरा रद्द केला. तुर्कस्थानने शरीफ यांना त्यांच्या देशात येण्यापासून रोखल्याचे अनेक प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले होते.

तुर्कस्थानचे पंतप्रधान रेसेप तय्यप एर्दोगान यांचे माजी विशेष सहाय्यक आझम जमील यांनीही ट्वीट करून शब्दाशब्दांत तुर्कस्थानमध्ये न येण्यास सांगितले. यावेळी तुर्कीला फक्त आपल्या देशातील लोकांची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे कृपया फक्त मदत कर्मचारी पाठवा, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले होते.