Pakistan Crisis : कंगाल ‘पाक’चा अखेरचा प्रयत्न; कर्मचारी वेतनात १० टक्के कपात, मंत्र्यांची संख्याही कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 01:26 PM2023-01-25T13:26:26+5:302023-01-25T13:50:22+5:30

आर्थिक संकट आणि महागाईचा सामना करत असलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

आर्थिक संकट आणि महागाईचा सामना करत असलेला पाकिस्तान कंगाल होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आता आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

कधी पाकिस्तान हात पसरून अमेरिका, चीन आणि अरब देशांकडून आर्थिक मदत मागत आहे, तर कधी शेजारी राष्ट्रांशी शांतता प्रस्थापित करण्याची वक्तव्ये करत आहे. या सर्व गोष्टी घडत असतानाच पाकिस्तानने आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

द न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी स्थापन केलेली राष्ट्रीय समिती आर्थिक संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचार करत आहे. या समितीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के कपात करण्याचाही प्रस्ताव दिला आहे.

इतकेच नाही तर समितीने मंत्रालय आणि विभागांच्या खर्चात 15 टक्के कपात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच मंत्र्यांची संख्या कमी करण्याचा सल्ला देण्यात आला असून समितीने सरकारला सल्लागारांची संख्या 78 वरून 30 करण्याची शिफारसही केली आहे. तर दुसरीकडे अन्य विना पैसे काम करतील.

दिवसेंदिवस पाकिस्तानची अवस्था बिकट होत चालली आहे. पाकिस्तानमध्ये पीठ आणि कांद्यासारख्या दैनंदिन गरजा भागवणेही कठीण होत आहे. परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भीषण आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान आता अन्य देशांच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहे.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानसाठी प्रत्येक दिवस संकटातून जात आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती अशी आहे की, एक महिन्याच्या आयातीसाठीही पाकिस्तानकडे परकीय चलनाचा साठा नाही. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीकडून कर्ज घेतल्यानंतरही पाकिस्तानवर डिफॉल्ट होण्याचा धोका आहे.

पाकिस्तानच्या परकीय चलनाचा साठा 2014 च्या पातळीवर पोहोचला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानकडे फक्त तीन आठवड्यांचा परकीय चलन साठा शिल्लक आहे. त्याच वेळी, महागाईचा दर 25 टक्क्यांच्या जवळ आहे.

दरम्यान, गव्हाच्या संकटामुळे देशात पिठाचा दुष्काळ पडला आहे. येथे पिठाचा भाव किलोमागे 150 रुपयांहून अधिक झाला आहे. पिठासाठी होणारी मारामाराठी त्याच्या व्हिडीओने देशाच्या बिकट स्थितीचे स्पष्ट चित्र मांडले आहे. लोक पीठाने भरलेल्या ट्रकचा अनेक किलोमीटर पाठलाग करत आहेत, इतकंच नाही तर प्रत्येक पोत्यासाठी लोक आपापसात भांडत आहेत.

महागाई आणि कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्यामुळे ढासळलेली पाकिस्तानी अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशातील सरकार आता इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मदत मागत आहे. पण कोणीही कर्ज देण्यास तयार दिसत नाही. आणखी एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये रोखीची टंचाई इतकी वाढली आहे की शिपिंग एजंट्सनीही असा इशारा दिला आहे की परदेशी शिपिंग कंपन्या त्यांच्या सेवा बंद करण्याचा विचार करत आहेत.