Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 14:20 IST2025-08-22T14:16:20+5:302025-08-22T14:20:46+5:30
Kim Jong Un Latest News: किम जोंग उन यांचे काही फोटो समोर आले, ज्यात ते लहान मुलांचे अश्रू पुसताना दिसत आहे, तर सैनिकांना धीर देत आहेत. या कार्यक्रमात किम जोंग उन यांचे डोळेही पाणावलेले दिसत आहेत.

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे त्यांच्या क्रूरतेबद्दलच जगात जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या क्रूरतेच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात. पण, आता काही फोटो समोर आलेत, ज्यात किम जोंग उन भावूक झाल्याचं दिसत आहे.
हुकुमशाह किम जोंग उन गुडघ्यावर बसलेले दिसत आहेत आणि श्रद्धांजली अर्पण करत आहेत. काही कुटुंबांना भेटताना, लहान मुलांना जवळ घेऊन त्यांना शांत करताना दिसत आहेत.
किम जोंग उन यांचे हे फोटो उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ज्यात उत्तर कोरियाचे हुकुमशाह हळवे झालेले पाहायला मिळत आहेत.
हे फोटो आहेत, उत्तर कोरियांच्या शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा. उत्तर कोरियाने आपले काही सैनिक रशियात पाठवले आहेत आणि हे सैनिक युक्रेनविरोधात लढत आहेत. या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात किम जोंग उन भावूक झाले.
याच कार्यक्रमात किम जोंग उन यांनी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या मुलांना जवळ घेतले. काही सैनिकांनाही धीर देत त्यांनी सात्वंन केलं.
किम जोंग उन यांनी काही जवानांना पदके देऊन सन्मानितही केले आहे. उत्तर कोरियातील कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, परदेशातील मोहिमांमध्ये लढणाऱ्या आणि विशेष शौर्य दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना डीपीआरके (उत्तर कोरियाचे) हिरो म्हणून गौरवण्यात आले.
किम जोंग उन यांनी शहीद स्मारकाजवळ जाऊन अभिवादन केलं. त्यांनी स्मारकाला पुष्प अर्पण केले आणि गुडघ्यावर बसून श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते भावूक झाल्याचे दिसले.
दक्षिण कोरिया आणि पाश्चिमात्य देशांतील गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने २०२४ या वर्षात १०,००० पेक्षा जास्त सैनिक रशियात पाठवले. हे सैनिक कुर्स्क भागात पाठवले गेले. या युद्धात लढताना उत्तर कोरियाचे ६०० उत्तर कोरियाचे सैनिक मारले गेले. तर अनेक जवान जखमी झालेले आहेत.