India-Pakistan Relation: पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा; इम्रान खान सरकार भारतासमोर झुकण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 02:40 PM2022-02-21T14:40:00+5:302022-02-21T14:50:04+5:30

India-Pakistan Relation: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार बंद झाल्याने पाकिस्तानला मोठा फटका बसत आहे. यामुळेच इम्रान खान यांचे वाणिज्य सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांनी भारतासोबत व्यापार करणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या गगनाला भिडणाऱ्या महागाईने भारताला आयात निर्बंधांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे वाणिज्य आणि गुंतवणुकीचे सल्लागार अब्दुल रझाक दाऊद म्हणाले की, भारतासोबत व्यापार करणे ही काळाची गरज आहे आणि ते भारतापेक्षा पाकिस्तानसाठी अधिक फायदेशीर आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अब्दुल रझाक दाऊद म्हणाले, 'पाकिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता, भारतासोबत व्यापार व्हायला हवा. अब्दुल रझाक दाऊद पुढे म्हणाले की, ते भारतासोबतच्या व्यापाराचे समर्थन करतात, कारण हा व्यापार पाकिस्तानसाठी खूप फायदेशीर आहे.

पाकिस्तानातील गगनाला भिडणारी महागाई आणि त्याचा लोकांवर होणारा विपरीत परिणाम याबद्दल बोलताना ते म्हणाले, या मुद्द्यावर मी भारत-पाक व्यापाराचे समर्थ करतो. तेल, कच्चा माल, यंत्रसामग्री आणि इतर वस्तूंच्या आयातीमुळे ही समस्या दूर होऊ शकते. याआधीही पाकिस्तानने भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याची चर्चा केली होती, मात्र विरोधकांच्या विरोधामुळे इम्रान सरकारला माघार घ्यावी लागली होती.

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार 2019 पासून कमी होत आहे. त्याच वर्षी जानेवारी महिन्यात काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. भारताने त्यासाठी पाकिस्तानला दोषी ठरवत पाकिस्तानसोबतच्या व्यापारावरील सीमाशुल्क 200 टक्क्यांनी वाढवले. याचा परिणाम असा झाला की काही महिन्यांतच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार 10 टक्क्यांहून कमी झाला.

भारताने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले, ज्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने भारतातून आयातीवर बंदी घातली. यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार 90 टक्क्यांनी घसरला. पाकिस्तानातील कापड आणि साखर उद्योगाला या व्यापार बंदीचा फटका बसला आहे, तर भारतातील सिमेंट, खडी मीठ आणि सुक्या मेव्याच्या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.

या व्यापार बंदीचा पाकिस्तानवर अधिक परिणाम झाला आहे. तेथील कापड आणि औषध उद्योग कच्च्या मालासाठी भारतावर अवलंबून आहेत आणि निर्बंधांचा त्यांच्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील कमी व्यापाराचे एक कारण म्हणजे उच्च शुल्क, कठीण व्हिसा धोरण आणि कठीण व्यापार प्रक्रिया. 2018 मध्ये जागतिक बँकेच्या अहवालानुसार, जर दोन्ही देशांनी व्यापार प्रक्रिया सुलभ केली, शुल्क कमी केले आणि व्हिसा धोरण सुलभ केले, तर दोघांचा व्यापार $2 अब्ज वरुन $37 अब्जपर्यंत वाढू शकतो.

अलीकडच्या काळात भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारात थोडीशी वाढ झाली आहे. भारताच्या मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मते, भारतातून पाकिस्तानला होणारी निर्यात नोव्हेंबर 2021 मध्ये 1.82 अब्ज वरुन डिसेंबरमध्ये 2.94 अब्ज झाली आहे.