CoronaVirus News: चीनची लस खिसा कापणार; आधी जगाला संकटात टाकणारा ड्रॅगन आता लस देऊन लुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 04:18 PM2020-08-20T16:18:45+5:302020-08-20T16:22:09+5:30

जगातील कोरोना बाधितांचा आकडा सव्वा दोन कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या ८० लाखांच्या पुढे गेली आहे. जगातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्थांना कोरोनाचा फटका बसला आहे.

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा २८ लाखांच्या पुढे गेला आहे. काल दिवसभरात देशात जवळपास ७० हजार कोरोना रुग्ण आढळून आले. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आता सगळ्यांचं लक्ष लसीकडे लागलं आहे.

रशियापाठोपाठ चीननं कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. चायना नॅशनल फार्मास्युटीकल ग्रुपनं (सिनोफार्म) तयार केलेली कोरोनावरील लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे.

चीनमध्ये तयार झालेली उत्पादनं स्वस्त असतात, असं म्हटलं जातं. मात्र सिनोफार्मनं तयार केलेल्या कोरोनावरील लसीची किंमत किती जणांना परवडणार, हा प्रश्न आहे.

कोरोनावरील लसीची किंमत १ हजार युवानपेक्षा कमी असेल, असं सिनोफार्मनं जाहीर केलं आहे. म्हणजेच भारतीय चलनात सिनोफार्मची लसीची किंमत १० हजार रुपयांच्या पुढे जाईल. त्यामुळे ही लस किती जणांना परवडणार हा प्रश्न आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठासह अनेक कंपन्या कोरोना लसीवर संशोधन करत आहेत. मात्र यातील कोणत्याही लसीची किंमत १० हजार रुपयांच्या आसपास नाही.

लसीच्या दोन शॉटची किंमत एक हजार युआनच्या खाली असेल, अशी माहिती सिनोफार्मचे संचालक लिऊ जिंगझेन यांनी दिली आहे.

सिनोफार्मनं बीजिंग आणि वुहानमध्ये तयार केलेल्या लसीची जूनमध्ये संयुक्त अरब अमिरातीत तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली.

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यावर मार्केटिंगचा आढावा घेतला जाईल. लस बाजारात आणल्यानंतर त्याचा दर फारसा नसेल, असा दावा जिंगझेन यांनी केला.

लसीचा दर फार जास्त नसेल. एका शॉटसाठी काही शे युआन मोजावे लागतील. तर दोन शॉटची किंमत हजार युआनपेक्षा कमी असेल, अशी माहिती जिंगझेन यांनी दिली.

सध्या जगभरात कोरोनाच्या लसीवर संशोधन सुरू आहे. सरकार आणि कंपन्या मिळून एकूण २०० हून अधिक लसींवर काम सुरू आहे. यापैकी काही लसी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत.