मोठ्या लोकसंख्येवर 'मूर्ख'पणाचा प्रयोग, रशियन लशीबाबत वैज्ञानिकांचे खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:35 PM2020-08-12T12:35:07+5:302020-08-12T12:53:55+5:30

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे म्हणणे आहे की, या लसीची चाचणी घेण्यात आली असून, त्यांच्या एका मुलीलाही ही लस देण्यात आली आहे.

कोरोनावर यशस्वी लस बनविल्याच्या रशियाच्या दाव्यावर वैज्ञानिकांनी जोरदार टीका केली आहे. तज्ज्ञांनी रशियाच्या या प्रयोगाला 'निष्काळजी आणि मूर्ख'पणाचे वर्तन असे वर्णन केले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे म्हणणे आहे की, या लसीची चाचणी घेण्यात आली असून, त्यांच्या एका मुलीलाही ही लस देण्यात आली आहे.

ऑक्टोबरपासून रशिया मोठ्या प्रमाणात लोकांना ही लस टोचणार आहे. शास्त्रज्ञांचे म्हणण्यानुसार रशिया करत असलेलं धाडस योग्य नाही. योग्यप्रकारे चाचणी न घेतलेल्या लसींचा लोकांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेनेही रशियन लसीला मान्यता दिलेली नाही. परंतु रशियाचा असा दावा आहे की, 20 देशांनी त्यांनी तयार केलेल्या लशीच्या लक्षावधी डोसची ऑर्डर दिली आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक फ्रान्सोइस बॉलॉक्स म्हणाले की, रशियाचं हे पाऊल 'बेदरकार आणि मूर्ख'पणाचे आहे. रशियन लशीचे दोन धोकादायक परिणाम होतील.

एकाचा लोकसंख्येवर वाईट परिणाम होईल, दुसरे म्हणजे लोक लस स्वीकारण्यास घाबरतील. मेट्रो डॉट कॉमच्या एका अहवालानुसार, साऊथॅम्प्टन विद्यापीठातील ग्लोबल हेल्थ रिसर्चर मिशेल हेड म्हणाले की, रशियन लस प्रत्यक्षात कशी आहे हे अस्पष्ट आहे.

कोणतीही लस मोहीम राबवण्यापूर्वी खरी माहिती जनतेसमोर ठेवणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून लोकांचा विश्वास वाढू शकेल. नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि एपिडेमिओलॉजिस्ट कीथ नील म्हणाले की, काही लोकांवर केलेल्या चाचण्यांमधून ही लस सुरक्षित असल्याचे दिसून येते.

परंतु संसर्ग रोखण्यासाठी जास्त मोठी चाचणी आवश्यक आहे. जोपर्यंत रशियाकडून विश्लेषणासाठी वैज्ञानिक कागदपत्रे प्रकाशित केली जात नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याबद्दल समजू शकत नाही.

लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील रोगप्रतिकारकशास्त्राचे प्रोफेसर डेनी ऑल्टमन म्हणतात की, लस मंजूर करण्यासाठी निकष मूलत: पुरेसे उंचावलेले आहेत.

जर लस सुरक्षित आणि प्रभावी नसेल तर सध्याची समस्या लक्षणीयरीत्या वाढेल. आम्ही आशा करतो की, रशियानं लशीचे हे निकष पूर्ण केलेले असतील.

ब्रिटनमधील वारविक बिझिनेस स्कूलचे औषध संशोधनतज्ज्ञ इफर अली म्हणतात की, वेगवान मंजुरी म्हणजे लशीच्या संभाव्य दुष्परिणामांची चौकशी करणे बाकी आहे.

जेव्हा लशीमध्ये समस्या उद्भवतात तेव्हा समान गोष्ट बर्‍याच वेळा घडतात, व्हायरस सहजपणे शरीरात प्रवेश करतो आणि त्या व्यक्तीस अधिक आजारी बनवतो.