Heart Attack टाळण्यासाठी करा 'ही' खास टेस्ट; तुमची व्यायाम करण्याची क्षमताही कळेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 07:27 PM2023-12-04T19:27:53+5:302023-12-04T19:31:30+5:30

जिममध्ये व्यायाम करताना Heart Attack येण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, हे टाळण्यासाठी एक छोटीशी चाचणी करुन घ्या.

Prevention of Heart Attack in Gym: आधुनिक जीवनशैलीमुळे आणि काम वाढल्यामुळे माणसाचे आयुष्य गुंतून गेले आहे, ज्यामुळे स्वतःच्या आरोग्यावरही लक्ष देता येत नाहीय. काही मानवी चुकांमुळे आपल्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ लागलाय. अलीकडच्या काळात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत, ज्यात व्यायाम करताना, डान्स करताना किंवा एखादा खेळ खेळताना हार्ट अटॅक येतोय.

मूळात हृदयविकाराची लक्षणे अगोदर कळणे फार कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते हृदयविकाराच्या झटक्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. फास्डफूड/निरोगी अन्न, शारीरिक हालचालींचा अभाव, नैराश्य, तणाव अशी अनेक कारणे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्याचा शरीरावर त्वरित परिणाम होत नाही. त्यामुळे काही गोष्टींचा अवलंब करुन तुम्ही हृदयविकाराचा झटका टाळू शकता.

या संदर्भात डॉ. नित्यानंद त्रिपाठी( कार्डिओलॉजी विभाग, फोर्टिस हॉस्पिटल, नवी दिल्ली) सांगतात की, सर्वप्रथम जिममध्ये व्यायाम करताना होणाऱ्या मृत्यूची अनेक कारणे असू शकतात, परंतु जर ते व्यायामामुळे होत असेल तर प्रथम हे जाणून घेणे आवश्यक आहे की, हे सामान्य व्यायामामुळे होत नाही, तर असामान्य व्यायामामुळे होते. जे लोक अचानक खूप हार्ड व्यायाम करतात, त्यांचा यामुळे मृत्यू होऊ शकतो.

यासाठी TMT म्हणजेच ट्रेडमिल टेस्ट (TMT) खूप चांगला पर्याय आहे. टीएमटी चाचणी एखाद्या व्यक्तीची व्यायाम क्षमता किती आहे, हे दर्शवते. या टेस्टमधून श्वसन प्रणाली आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीबद्दल माहिती देते. टीएमटी चाचणी चांगली असल्यास डॉक्टर त्या व्यक्तीला व्यायाम करण्यास सांगू शकतात. पण व्यायाम करतानाही अतिशय सोप्या पद्धतीने आणि तज्ञांच्या निगरानीत व्याया करायला हवा. पहिले एक किंवा दोन महिने सामान्य व्यायाम करा. जसजशी तुमची क्षमता वाढते तसतसे तुम्ही व्यायामाचा भार वाढवू शकता.

डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले की, ट्रेडमिल टेस्टमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक माहिती समोर येते. उदा- एखाद्या व्यक्तीची काम करण्याची क्षमता किती आहे, व्यायाम करताना रक्तदाब किती वाढतो, हृदयाचे ठोके किती वाढतात, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आणि श्वसन प्रणाली कसा प्रतिसाद देते, हृदय कसे धडधते, ही सर्व माहिती मिळते.

टीएमटी चाचणी नियंत्रित वातावरणात केली जाते, व्यक्तीला सुरुवातीला ट्रेडमिलवर हळू चालण्यास सांगितले जाते. यामध्ये हृदयाची गती, बीपी आणि ईसीजी तपासले जाते. यामध्ये व्यायामादरम्यान कोणत्या टप्प्यावर हृदयाला त्रास होऊ लागतो हे पाहिले जाते. एखादी व्यक्ती थकते तेव्हा बीपी आणि हृदय गती किती आहे, हे तपासले जाते. व्यायामाचा भार वाढल्यावर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली काम करत नसेल, तर याचा अर्थ व्यक्तीची व्यायाम क्षमता खूपच कमी आहे.