बीपी हाय करून घेऊ नका! फक्त 'हे' खा....आयुष्यात कधी ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 11:55 AM2021-09-10T11:55:27+5:302021-09-10T12:21:41+5:30

उच्च रक्तदाबामुळे भविष्यात ह्रदय विकार होण्याचा धोका वाढू शकतो. औषधांनी रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येतं. मात्र त्यासोबतच जीवनशैलीत बदल, योग्य आणि संतुलित आहार आणि चालण्याचा व्यायाम केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. यासाठीच तुमच्या ह्रदयाचे आरोग्य वाढवणारे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ठ करा. ज्यामुळे तुमच्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर असे पदार्थ खा ज्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम मिळेल. कारण या खनिजांची तुमच्या ह्रदयाला निरोगी राहण्यासाठी जास्त गरज असते.

द्राक्षं, संत्री, लिंबू अशा आंबट फळांमुळे तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो. कारण यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि तुमच्या ह्रदयाला निरोगी ठेवणारे अनेक घटक असतात. ही फळं खाण्यामुळे तुमचा रक्तदाब तर कमी होतोच शिवाय ह्रदयाचे आरोग्यही सुधारते. काही संशोधनात चालण्याच्या व्यायामानंतर लिंबू पाणी पिण्यामुळे अनेकांना फायदा झालेला दिसून आलेला आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये या फळांचा रसदेखील घेऊ शकता.

ह्रदयाच्या संपूर्ण आरोग्यासाठी ब्रोकोली फायदेशीर आहे. कारण यामुळे तुमचे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. निरनिराळ्या भाज्यांप्रमाणे तुमच्या आहारात ब्रोकोलीदेखील असायलाच हवी. कारण ब्रोकोली मध्ये फ्लेव्होनॉईड अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे. ज्यामुळे तुमचा रक्तदाब कमी होऊ शकतो.

पालक ही पालेभाजी सर्वात पोषक आणि शरीराला अतिशय आवश्यक आहे. पालकला स्वतःची अशी खास चव नसल्यामुळे अनेकजण पालक खाण्याचा कंटाळा करतात. मात्र पालक खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे अँटीऑक्सिडंट, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम मिळत असते. रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीतर पालक आहारात असणं खूपच गरजेचं आहे. कारण यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहू शकतो

डाळी आणि कडधान्यांमधून तुम्हाला शरीराला आवश्यक असणारे फायबर्स, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम मिळतात. ज्यामुळे तुमचा रक्तदाब सुधारण्यास मदत होते. डाळी आणि कडधान्यांच्या नियमित सेवनामुळे हळूहळू उच्च रक्तदाबाची पातळी कमी होऊ शकते. यासाठी हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांचा आहार डाळी आणि कडधान्याने समृद्ध असावा.

भोपळ्याच्या बिया दिसायला जरी लहान असल्या तरी त्याचा फायदा मात्र खूप मोठा आहे. कारण या बियांमध्ये तुमच्या रक्तदाबाला नियंत्रित ठेवणारे पोषक घटक असतात. यातील मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, अर्गीनाइन, अमिनो अॅसिड, ओमेगा 3 फॅटी अॅसिड तुमच्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स ठेवतात आणि ह्रदयावर येणारा रक्तदाबाचा ताणही कमी होतो.

बेरीज हा फळांचा प्रकार सिझनल फळ असून हंगामानुसार स्टॉबेरी, कॅनबेरी, रसबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी बाजारात उपलब्ध असतात. या बेरीजमध्ये ह्रदय निरोगी ठेवणारे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे रक्तदाब तर नियंत्रित राहतोच शिवाय ह्रदयविकाराचा धोका देखील कमी होतो. बेरीजमध्ये अॅंटि ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे त्यांना निरनिराळे रंग प्राप्त झालेले असतात. या अँटीऑक्सिडंटमुळे तुमच्या ह्रदयावरचा ताण कमी होऊ शकतो.

चिआ सीड आणि अळशी या बिया दिसायला अगदी छोट्या आहेत मात्र तुमच्या ह्रदयाचे आरोग्य राखण्याचे सामर्थ्य या बियांमध्ये आहे. या बियांमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर्स भरपूर असतात ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहू शकतो.

गाजराचा वापर आपण ज्युस, सलाड, कोशिंबीर, मिठाई अशा अनेक गोष्टींसाठी करत असतो. गाजरामध्ये असे पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि त्यांचा दाह आणि वेदना कमी होऊ शकतात. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी गाजर हे खूपच उपयुक्त कंदमुळ आहे. तुम्ही गाजर कच्चे अथवा शिजवून दोन्ही प्रकारे खाऊ शकता. मात्र ते कच्च्या स्वरूपात खाणं ह्रदयासाठी जास्त फायदेशीर आहे.

बीटामधील पोषक घटकांमुळे तुमच्या तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. रक्तवाहिन्यांना आराम आणि रक्तदाबाची पातळी सुधारण्यामुळे तुमचे ह्रदय अगदी निरोगी राहू शकते. यासाठीच आहारात बीटाचा रस अथवा कच्च्या बीटाचा अवश्य समावेश करा.