Corona Vaccination: ...तर आणखी वाढणार कोविशील्डची पॉवर; तब्बल दीड लाख लोकांवर झालं सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:19 PM2021-08-03T14:19:19+5:302021-08-03T14:24:35+5:30

Corona Vaccination: सर्वेक्षणात आरोग्य कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग; ज्येष्ठांची संख्यादेखील मोठी

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे.

देशातील लसीकरण मोहिमेत प्रामुख्यानं दोन लसींचा वापर होत आहे. कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी लसीकरण अभियानात वापरल्या जात आहेत. त्यातही सर्वाधिक वापर कोविशील्डचा होत आहे.

पहिला डोस कोविशील्डचा घेतल्यानंतर, दुसरा डोस फायझर किंवा मॉडर्नाचा घेतल्यास त्यामुळे मिळणारं संरक्षण अधिक चांगलं असेल, अशी माहिती समोर आली आहे. डेन्मार्कच्या सीरम इन्स्टिट्यूटनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.

भारतात कोविशील्ड नावानं ओळखली जाणारी लस परदेशात ऍस्ट्राझेनेका नावानं ओळखली जाते. जगातील अनेक देशांमध्ये ऍस्ट्राझेनेकाचा वापर होतो. ऍस्ट्राझेनेका आणि मॉडर्ना/फायझरच्या मिक्स प्रयोगाबद्दल डेन्मार्कच्या सीरम इन्स्टिट्यूटनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं.

ऍस्ट्राझेनेका लसीचे काही साईड इफेक्ट्स समोर आल्यानं डेन्मार्कनं एप्रिलमध्ये तिचा वापर थांबवला. त्यामुळे ऍस्ट्राझेनेकाचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस कोणत्या लसीचा द्यायचा आणि त्याचे परिणाम काय होतील याबद्दल सीरम इन्स्टिट्यूटनं संशोधन केलं.

संशोधनात १ लाख ४४ हजारांहून अधिक लोकांचा सहभाग आहे. यातील बहुतांश जण आरोग्य कर्मचारी आहेत. याशिवाय अनेक ज्येष्ठ नागरिकांचादेखील समावेश आहे.

संशोधनात सहभागी झालेल्यांना पहिला डोस ऍस्ट्राझेनेकाचा आणि दुसरा डोस फायझर/मॉडर्नाचा देण्यात आला. याचे चांगले परिणाम दिसून आले.

पहिला डोस कोविशील्ड आणि दुसरा डोस फायझर/मॉडर्नाचा देण्यात आल्याच्या १४ दिवसांनंतर कोरोना होण्याचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होत असल्याची माहिती स्टेट सीरम इन्स्टिट्यूटनं (एसएसआय) दिली.

स्टेट सीरम इन्स्टिट्यूटनं केलेल्या सर्वेक्षणाची माहिती गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली. जवळपास ५ महिने केलेल्या संशोधनानंतर सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या कालावधीत अल्फा व्हेरिएंटचा प्रभाव अधिक होता.

भारतात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेकांना अद्याप पहिलाच डोस मिळत नाही. तर ८४ दिवस उलटूनही कोविशील्डचा दुसरा डोस न मिळालेल्यांचं प्रमाण लक्षणीय आहे.

मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) महिन्याभरापूर्वीच परवानगी दिली आहे. मात्र मॉडर्ना लस अद्याप लसीकरण मोहिमेत समाविष्ट झालेली नाही. फायझरबद्दल सरकारनं सकारात्मक संकेत दिले आहेत. पण या दोन्ही लसींचा देशात वापर होत नाहीए.