'या' समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतो आल्याचा चहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 06:24 PM2018-11-15T18:24:05+5:302018-11-15T18:28:48+5:30

सकाळी एक कप आल्याचा चहा प्यायल्यानं तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायद्यांचा लाभ होतो. आलं हे एक व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि अन्य खनिजांचा एक भांडार आहे. यामुळे आले हे आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. आल्याच्या चहामध्ये तुम्ही पुदीना, मध आणि लिंबाचाही समावेश करू शकता. अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रीशन अनुसार आल्याचा चहा प्यायल्यानं आरोग्याचे अनेक फायदे मिळतात.

आल्याच्या चहामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय, अन्न शोषण्याची क्षमताही वाढते. प्रचंड प्रमाणात खाल्ल्यानंतर पोट फुगण्याची जी समस्या निर्माण होते, त्यापासून सुटका मिळते.

आल्याच्या चहामध्ये व्हिटॅमिन, खनिजे आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण असल्यानं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित असलेल्या समस्या कमी होतात. शिवाय धमण्यांवर चरबी साचू नये, यासाठी आले उत्तम कार्य पार पाडते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.

श्वसनासंबंधातील आजारांपासून सुटका करण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे सर्दी आणि खोकल्यावरही फायदेशीर ठरतो.

मासिक पाळीदरम्यान तुम्हाला एखाद्या अवयवात पेटके (क्रॅम्प) येण्याची समस्या असेल तर यावर उत्तम उपाय म्हणजे आल्याचा चहा. आल्याच्या चहाची चव किंचितशी कडू लागले. पण तुम्ही यामध्ये मध मिश्रित करुनदेखील त्याचा आस्वाद घेऊ शकता.

आल्याच्या चहामध्ये डोके शांत करण्याचे गुण असल्यानं, यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. तणावापासून मुक्ताता मिळवण्याचे गुणधर्म आल्यामध्ये असल्यानं आल्याचा चहा नक्की आपल्या आहारात समाविष्ट करावा.

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक क्षमता अतिशय कमजोर आहे. आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण प्रचंड असते, यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

जर तुम्ही लांबच्या प्रवासासाठी जाणार असाल तर एक कप चहा नक्की प्यावा. यामुळे प्रवासादरम्यान ज्यांना गाडी लागल्यानं उलट्यांचा जो त्रास होतो, तो काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळते.