मोदी सरकारनं आदेश काढला! आता रात्री ११.३० ते सकाळी ६ व्हॉट्स ऍप बंद; खरं की काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 01:55 PM2021-10-13T13:55:13+5:302021-10-13T14:00:13+5:30

fact check: काही दिवसांपूर्वी काही तास व्हॉट्स ऍप बंद होतं; त्यानंतर एक मेसेज व्हायरल

काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ऍपची सेवा खंडित झाली. त्यामुळे मेसेज पाठवण्यात, प्राप्त करण्यात अडचणी आल्या. रात्री निर्माण झालेली ही समस्या पाच ते सहा तासांनी सुटली. याचा फटका कोट्यवधी लोकांना बसला.

व्हॉट्स ऍप हा आता अनेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ऍप डाऊन झालं असताना अनेकांनी फोन रिस्टार्ट करून पाहिले. काहींनी तर थेट व्हॉट्स ऍप अनइन्स्टॉल करून ते पुन्हा इन्स्टॉल केलं.

व्हॉट्स ऍपची सेवा खंडित झाल्यानं अनेक जण अस्वस्थ झाले. यानंतर आता व्हॉट्स ऍपबद्दलचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. भारत सरकारनं रात्रीच्या वेळेत व्हॉट्स ऍप बंद ठेवण्याचा आदेश जारी केल्याचा उल्लेख यामध्ये आहे.

फेसबुकची मालकी असलेलं व्हॉट्स ऍप रात्री ११.३० ते सकाळी ६ या कालावधीत बंद असेल, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. हा मेसेज अधिक वापरकर्त्यांना फॉरवर्ड न केल्यास वापरकर्त्याचं अकाऊंट निष्क्रिय करण्यात येईल, असंदेखील मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

व्हॉट्स ऍपबद्दल व्हायरल झालेला मेसेज खोटा असल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्स ऍप अकाऊंट सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना दर महिन्याला पैसे द्यावे लागतील, असाही मेजेस व्हायरल झाला आहे.

फॉरवर्डेड मेसेजमध्ये देण्यात आलेल्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर वापरकर्त्यांचं एक नवं आणि सुरक्षित व्हॉट्स ऍप अकाऊंट सुरू होईल, असा दावादेखील करण्यात आला आहे. हा मेसेजदेखील बोगस आहे.

प्रेस इंडिया ब्युरोनं ट्विट करून व्हॉट्स ऍपबद्दलचे मेसेज खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं सांगितलं आहे. सरकारनं व्हॉट्स ऍपसाठी कोणताही आदेश काढला नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.

'रात्री ११.३० ते सकाळी ६ या कालावधीत व्हॉट्स ऍप बंद राहणार. व्हॉट्स ऍप सुरू ठेवण्यासाठी पैसे भरावे लागणार हे दावे खोटे आहेत. भारत सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही', असं पीआयबीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read in English