नवज्योत सिंग सिद्धूप्रमाणेच सुशील कुमारची तुरुंगातून होणार का सुटका?; क्रिकेटपटूचे ३३ वर्षांपूर्वीचे प्रकरण तुम्हाला माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 05:09 PM2021-05-24T17:09:57+5:302021-05-24T17:51:37+5:30

बीजिंगपाठोपाठ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमारला ( Sushil Kumar) रविवारी हत्येच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केले.

बीजिंगपाठोपाठ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या कुस्तीपटू सुशील कुमारला ( Sushil Kumar) रविवारी हत्येच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केले. त्याच्यावर कुस्तीपटू सागर धनकडच्या हत्येचा आरोप आहे आणि आता सुशीलला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

सुशील कुमारला भारतीय रेल्वेनंही कामावरून काढल्याचे वृत्त समोर येत आहे. ३३ वर्षांपूर्वी रस्त्यावरील झालेल्या छोट्याशा भांडणात मारमारी झाली होती आणि त्यात भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू हा आरोपी होता.

काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धूवर मित्रांसोबत एका वाहन चालकाला मारण्याचा आरोप होता. सुरुवातीला या प्रकरणात सिद्धूची निर्दोष मुक्तता झाली होती, परंतु २०१८ मध्ये या प्रकरणावर पुन्हा खटला चालला अन् सिद्धूवर नुकसान पोहचवण्याचा आरोप ठेवण्यात आला.

सुशील कुमारवर पोलिसांनी ३०२, ३०८, ३६५, ३२५, ३२३, ३४१, ५०६, २६९, १८८, १२०-बी आणि ३४ या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सुशीलच सागरला मारत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

२७ डिसेंबर १९८८मध्ये नवज्योत सिंग सिद्धू आणि त्याचा मित्र रुपिंदर सिंग संधू याच्यासोबत पटियाला येथील शेरांवाला गेट क्रॉसिंगच्या येथे आपल्या मारुती जिप्तीत बसले होते. या दरम्यान मारुती कारमध्ये बसून गुरनाम सिंग तेथे आला आणि त्यानं जिप्सीत बसलेल्या लोकांना वाट मोकळी करून देण्यास सांगितले.

यावरून सुरुवातीला शाब्दिक भांडण झालं आणि त्यानंतर सिद्धू व संधू यांनी गुरनामला मारहाम केली. सिद्धूनं गुरनामच्या डोक्यावरही मारलं. त्यानंतर गुरनामचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. नवज्योत सिंग सिद्धू व त्याच्या मित्रावर गुन्हा नोंदवला गेला. ट्रायल कोर्टात हत्येचा खटला चालला, परंतु १९९९मध्ये ट्रायल कोर्टानं दोघांची निर्दोष मुक्तता केली. पुराव्याअभावी हे दोघे सुटले.

२००२मध्ये पंजाब सरकारनं या निर्णायाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. डिसेंबर २००७मध्ये पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयानं सिद्धू व त्याच्या मित्राला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी जाहीर केले. पण, इथेही ते हत्येच्या आरोपाखाली दोषी नाही ठरले.

सिद्धूला उच्च न्यायालयानं तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तेव्हा तो अमृतसर येथील भाजपाचा खासदार होता. सिद्धूकडून अरुण जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयात केस लढवली आणि सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा रोखली.

गुरनाम सिंग याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचे न्यायालयात सांगण्यात आले. त्याच्या मृत्यूचा आणि मारहाणीचा काहीच संबंध नव्हता. २०१८मध्ये या केसचा निकाल आला आणि सिद्धूची सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातूनही निर्दोष सुटका झाली. न्यायालयानं या निर्णयावर पुन्हा फेरविचार करावा असे सांगितले, परंतु फाईल पुढे सरकलेली नाही.