१२ वर्षाच्या निरागस मुलीने दिला मुलाला जन्म, प्रसूतीनंतर धक्कादायक माहिती झाली उघड 

By पूनम अपराज | Published: December 30, 2020 06:37 PM2020-12-30T18:37:51+5:302020-12-30T19:26:37+5:30

Rape : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका 11 वर्षाच्या मुलीने मुलाला जन्म दिला आहे.

सोमवारी उम्मेद हॉस्पिटलमध्ये प्रसूतीनंतर मुलीने आपल्यासोबत घडलेले सर्व कुटुंबियांना सांगितले. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 9 महिन्यांपूर्वी तिच्यावर बलात्कार करणार्‍या आरोपीला अटक केली. अल्पवयीन मुलीच्या वडिलांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

एएसपी दीपक शर्मा म्हणाले की, 11 वर्षांची मुलगी इयत्ता 6 ची विद्यार्थिनी आहे. सुमारे ८ ते ९ महिन्यांपूर्वी शेजारच्या भागात राहणाऱ्या ३० वर्षीय अरविंद मेघवालने आपला मोबाइल दाखवण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला व तेथून निघून गेला. भीतीपोटी मुलीने कुटुंबीयांना त्याविषयी माहिती दिली नाही.

रविवारी तिची तब्येत बिघडली आणि कुटुंबीयांनी तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांना तिच्या गर्भधारणेबद्दल कळले आणि यानंतर पीडितेला उम्मेद रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तिने मुलाला जन्म दिला.

या प्रसूतीनंतर मुलगी व तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रुग्णालय प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर कुटुंबीयांनी रूग्णालयात पोहोचून लेखी तक्रार दिली. 

तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपी अरविंदला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात भादंवि कलम 376 ए आणि  376 बी तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळगडचे डीएसपी धर्मेंद्र दुकिया या प्रकरणाचा तपास करत आहेत.