Ashok Kharat Crime: दैवी शक्ती, खोलीत पवित्र आत्मा, तीर्थ, पूजा...; महिलांना 'असं' जाळ्यात अडकवायचा अशोक खरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:40 IST2026-03-24T14:32:36+5:302026-03-24T14:40:43+5:30

Ashok Kharat Case Crime News: अशोक खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याच्या अटकेनंतर आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याच्या अटकेनंतर आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

एका ३४ वर्षीय शिक्षिकेने खरातवर गंभीर आरोप करत त्याच्या भयंकर कृत्यांचा पर्दाफाश केला. महिला आणि सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करून हा ढोंगी बाबा त्यांचं शोषण कसं करायचा याची माहिती आता समोर आली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तीन-चार वर्षांपूर्वी पतीच्या नोकरीतील अडचणींमुळे ती खरातच्या संपर्कात आली होती. सुरुवातीला त्याने अंकशास्त्राच्या माध्यमातून उपाय सांगून तिचा विश्वास जिंकला.

हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. एका भेटीदरम्यान अशोक खरातने 'हीलिंग' करण्याच्या बहाण्याने महिलेचा हात पकडून अश्लील चाळे केले, त्यानंतर ती तिथून निघून गेली.

खरात कशाप्रकारे लोकांना जाळ्यात ओढायचा, याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे. तो आपल्या केबिनमध्ये बसून लोकांच्या खासगी आयुष्याबद्दलचे प्रश्न मोठ्याने विचारायचा.

आयफोनमधील 'सिरी'चा वापर करून दिलेल्या उत्तरांना तो 'दैवी शक्ती' किंवा 'देवाचा आवाज' असल्याचं सांगायचा. "या खोलीत एक पवित्र आत्मा आहे जो कधीच खोटं बोलत नाही" असा बनाव करून तो लोकांची खासगी माहिती मिळवून त्यांच्यावर आपला प्रभाव टाकायचा.

महिलेने आरोप केला आहे की, एकदा ती पतीसोबत खरातकडे गेली असता, त्याने पतीला बाहेर बसवून तिला आत बोलावलं. एका विशेष विधीचा बहाणा करून तिला तांब्याच्या पेल्यातून काहीतरी 'तीर्थ' प्यायला दिलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

महिलेने विरोध केला असता, "जर कोणाला काही सांगितलं, तर तुझ्या पतीच्या जीवावर बेतेल" अशी धमकी त्याने दिली. पीडितेने सांगितलं की, खरातने या विधीच्या नावाखाली तिच्या पतीकडून सुमारे ५० हजार रुपये उकळले आणि आणखी पूजा करण्यासाठी दबाव टाकला.

या प्रकरणात आता अनेक महिला पुढे येत असून त्यांनी खरातवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, अद्यापही काही पीडित महिला भीतीपोटी समोर येण्यास कचरत असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक पोलिसांनी आरोपी अशोक खरातला अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस सर्व आरोपांची गांभीर्याने चौकशी करत आहेत.