Zomato चे शेअर्स आपटले, कंपनी १-१ रूपयांत कर्मचाऱ्यांनाच वाटणार ४.६६ कोटी शेअर्स; पुन्हा तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 03:49 PM2022-07-27T15:49:11+5:302022-07-27T15:55:44+5:30

गेल्या काही दिवसांत झोमॅटोचे शेअर्स २१ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.

Zomato Share Price : फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे शेअर्स गेल्या काही दिवसांमध्ये २१ टक्क्यांपर्यंत घसरले होते. शेअर्सच्या होणाऱ्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर कपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना १-१ रूपयांमध्ये ४.६६ कोटी शेअर्स वाटण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी हे शेअर्स ESOP (एम्प्लॉई स्टॉक ऑक्शन प्लॅन) अंतर्गत देत आहे.

२६ जुलै रोजी कंपनीनं शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. तसंच कंपनीच्या नॉमिनेश अँड रेम्युनेशन कमिटीनं ४,६५,५१,६०० इक्विटी शेअर्सना स्टॉक ऑप्शन अंतर्गत कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय मंजूर केला आहे, असंही सांगण्यात आलंय.

झोमॅटोच्या शेअर्सच्या सध्याच्या किमतीनुसार पाहिलं तर ४.६६ कोटी शेअर्सची किंमत आता १९३ कोटी रूपयांच्या जवळपास असेल. कंपनीच्या शेअर्समध्ये आजही तेजी दिसून आली.

झोमॅटोच्या ६१३ कोटी शेअर्सचा एका वर्षाचा लॉक इन पीरिअड २३ जुलै रोजी पूर्ण झाला. तसंच हा लॉक इन पीरिअड संपल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्री दिसून येईल अशी शक्यता तज्ज्ञांनी यापूर्वीच व्यक्त केली होती.

आयपीओच्या पूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते ते आता त्याची विक्री करत आहेत. या विक्रीचं मोठं कारण म्हणजे झोमॅटोचं मार्केट कॅप याच्या अखेरच्या प्रायव्हेट मार्केच व्हॅल्यूएशन ५.५ अब्ज डॉलर्सच्याही खाली आले आहे, असे तज्ज्ञ म्हणतात.

लॉक-इन कालावधी ठराविक गुंतवणूकदारांसाठी असतो. जेव्हा जेव्हा स्टॉकच्या मोठ्या टक्क्याचे लॉक-इन संपते तेव्हा ते गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकतात. लॉक-इन कालावधीपूर्वी ते त्यांचे शेअर्स विकू शकत नाहीत.

अशा स्थितीत जर गुंतवणूकदारांनी तो शेअर विकायला सुरुवात केली तर त्याच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. पण गुंतवणूकदारांनी शेअर्स विकलेच पाहिजेत असे नाही. गेल्या तीन महिन्यांत या शेअरच्या किंमतीत ३३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६८.६५ रुपये आहे.

२३ जुलै २०२१ रोजी झोमॅटोचे शेअर्स शेअर बाजारावर लिस्ट करण्यात आले होते. आयपीओतील गुंतवणूकदारांना हे शेअर्स ७६ रूपये प्रति शेअर दरानं मिळाले होतं.तर बीएसईवर हे शेअर ११५ रूपयांवर लिस्ट झाले होते.