SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी UPI आणि इंटरनेट बँकिंग सेवा बंद; आधीच करा महत्त्वाचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 07:26 PM2021-05-20T19:26:31+5:302021-05-20T19:44:05+5:30

State Bank of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. ग्राहकांना सलग तीन दिवस इंटरनेट बँकिंग आणि यूपीआयसारख्या सुविधांचा काही काळ वापर करता येणार नसल्याचं बँकेने म्हटलं आहे.

बँकेच्या यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी काही तांत्रिक देखभालीचे काम होणार आहे, ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. हे लक्षात घेता ग्राहकाने लवकरात लवकर आपली काम पूर्ण करावीत, असंही बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

स्टेट बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 21 मे रोजी दुपारी 22.45 वाजता, 22 मे रोजी दुपारी 1.15 वाजता आणि 23 मे रोजी दुपारी 2.40 ते सायंकाळी 6.10 या वेळेत देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे.

इंटरनेट बँकिंग, इंटरनेट बँकिंग (INB), योनो, योना लाईट आणि यूपीआयवर बँकिंग सुविधा यावेळी उपलब्ध होणार नाहीत. या असुविधेबद्दल बँकेने ग्राहकांकडे दिलगिरी व्यक्त केली असून, सहकार्याचं आवाहन केलं आहे. बँकांकडून देखभाल दुरुस्तीचे काम वेळोवेळी केले जाते.

तांत्रिक देखरेखीसाठी बँक संबंधित सुविधा काही काळ बंद असतात. ज्यावेळी देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते, तेव्हा ग्राहकांना इंटरनेट किंवा ऑनलाईन बँकिंग संबंधित सुविधा न वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यावेळी कोणी त्याचा वापर केल्यास ते काम करणार नाही, उलट पैशांचे व्यवहार अडकूही शकतात.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक सतत आपल्या कामकाजामध्ये बदल करीत आहे. आता बँकेचे लक्ष डिजिटल बँकिंगवर अधिक आहे. वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून बँकिंग सेवा वाढविण्यासाठीही जोरदार तयारी केली जात आहे.

स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना रोख किंवा एटीएमऐवजी अधिक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याचा सल्ला दिलाय. बँकेच्या वेबसाईटद्वारे आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय आणि रुपे कार्डाच्या वापरास प्रोत्साहन देत असल्याचं सांगितले जात आहे.

कोरोना कालावधीत ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेता स्टेट बँकेने कित्येक महत्त्वाची पावले उचललीत. घाईघाईने बँकेचे काम निकाली काढावे लागणार्‍या ग्राहकांसाठी संपर्कहीन सेवा सुरू केलीय. यासाठी स्टेट बँकेने 1800 112 211 आणि 1800 425 3800 असे दोन टोल फ्री नंबर दिलेत.

तुम्ही कोणत्याही क्रमांकावर कॉल करून बँकिंग सेवा मिळविण्याची विनंती करू शकता. या सेवेचा वापर करून ग्राहकांना बँक खात्यातील शिल्लक आणि शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती आयव्हीआर आणि एसएमएसद्वारे मिळू शकेल. या क्रमांकावर कॉल करून आपण एटीएम कार्ड बंद करण्याची विनंती पुन्हा करू शकता.

बँकेने घरपोच सेवा सुरू केली आहे. रोख रक्कम जमा करणे किंवा रोख रक्कम काढणे, चेक क्लिअरन्स आणि बँक शाखांमध्ये सरकारी व्यवहार यांसारखी अत्यंत महत्त्वपूर्ण कामे बँकेतच केली जात आहेत. उर्वरित कामे शक्य तितक्या ऑनलाईन करण्यावर भर देण्यात आला आहे.

एटीएम किंवा ग्रीन पिन जारी करू शकता, नवीन एटीएम कार्ड देऊ शकता किंवा जुने कार्ड बंद करू शकता. ग्राहकांशी किमान संपर्क साधणे, कोरोना संसर्गाची जोखीम कमी करण्यासाठी बँकेचा प्रयत्न आहे, यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न केले जात आहेत.

बँकेत येणाऱ्या ग्राहकांना स्वच्छता, मास्क आणि सामाजिक अंतर यांना महत्त्व दिले जात आहे. गर्दी होऊ नये म्हणून बँकेची वेळही बदलली आहे. बँकेत येणाऱ्यांसाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या कठीण काळात बँक कर्मचारी लोकांची सेवा करण्यात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत सरकारी बँकांव्यतिरिक्त आपल्या कर्मचार्‍यांचे जीव वाचवण्यासाठी खासगी क्षेत्रातील बँकांनीही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

बहुतेक बँकांनी आपल्या कामकाजाचे तास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मर्यादित केले आहेत. लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन बँका मुख्यत्वे पैसे जमा आणि पैसे काढण्याचे काम करत आहेत. याशिवाय शासकीय काम आणि रेमिटेन्स सेवाही सुरू आहे.

भारतीय बँक असोसिएशनने बँकांना दिलेल्या निर्देशानुसार डोअर स्टेप बँकिंग सेवेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. या सेवेनुसार बँक आपल्या घरी येऊन तुमची सेवा करणार आहे.