SBI ग्राहकांसाठी अलर्ट! ऑनलाईन व्यवहार करताना करू नका 'हे' काम; वेळीच व्हा सावध नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 10:38 AM2021-06-14T10:38:33+5:302021-06-14T10:52:21+5:30

State Bank of India : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना अशा फसवणूकीपासून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्याचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. सर्व व्यवहार हे आता प्रामुख्याने डिजिटल पद्धतीनेच केले जातात. कोरोनाच्या संकटात ऑनलाईन व्यवहारांमुळे सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरबसल्या अनेक कामं अगदी झटपट होत आहेत.

ऑनलाईन व्यवहार करणं जसं सोयीचं आहे तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत. हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. विविध मार्गाने ते लोकांची फसवणूक करत असल्याने सतर्क राहणं गरजेचं आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना अशा फसवणूकीपासून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसबीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

एसबीआयने ट्विटरवर आपल्या लाखो ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार SBI ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.

"आम्ही आमच्या ग्राहकांना फसवणूक करणार्‍यांपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहोत. तुमचा कोणताही संवेदनशील डेटा ऑनलाईन शेअर करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करुन अ‍ॅप डाउनलोड करू नका, अशी सूचना केली आहे."

एसबीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही ग्राहकाने त्याची वैयक्तिक माहिती जसं की जन्मतारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी/पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी यासारखी माहिती कोणसोबत शेअर करू नका.

एसबीआय, आरबीआय, शासकीय कार्यालय, पोलीस, केवायसी प्राधिकरण अशा विविध नावाने फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. एसबीआय किंवा त्याचे कोणतेही प्रतिनिधी तुम्हाला कधीही ईमेल, एसएमएस पाठवत नाही.

तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा वन टाईम पासवर्डसाठी ते फोन करत नाहीत. त्यामुळे तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. कोणत्याही अज्ञात लिंकवर जाऊन मोबाईल App डाऊनलोड करणं टाळा. तसेच अशाप्रकारे येणाऱ्या फसव्या मेलपासूनही सावध राहा.

ईमेल, एसएमएस आणि इतर सोशल मीडियाद्वारे आलेल्या कोणत्याही ऑफरला प्रतिसाद देऊ नका. तुमची सुरक्षा ही फक्त तुमच्याच हातात आहे. त्यामुळे सुरक्षित राहा, अशी सूचना बँकेने दिली आहे.

देशात इंटरनेट वेगाने पसरत आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या घटनांचा तपास करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एक सायबर सेल तयार करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

येत्या काळात पैशांचे व्यवहार करताना समस्या येऊ नये म्हणून बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना 30 जूनपूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं, अशा सूचना दिल्या आहेत.

सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागाने पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढवली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं. पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे असं म्हणत बँकेने ग्राहकांनी सूचना दिली आहे.

पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बंद होऊ शकतं. तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे 30 जूनपूर्वी पॅन आधार लिंक करुन घ्या, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

Read in English