आरबीआय कर्जदारांना देणार 'शॉक'! पुन्हा ईएमआय वाढणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:02 AM2022-12-05T11:02:10+5:302022-12-05T11:17:26+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेची आज मॉनेटरी बैठक होणार आहे. ही बैठक आज ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेची आज मॉनेटरी बैठक होणार आहे. ही बैठक आज ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेट वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो. याअगोदर तीनवेळा रेपो रेट वाढवले आहेत, आता चौथ्यांदा वाढवण्याची शक्यता आहे. पण, यावेळी कमी टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक व्याजामध्ये २५ ते ३५ बेसिस प्वाइंटने वाढवू शकते.

महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करु शकते. गेल्या काही दिवसात महागाई आटोक्यात आली आहे, पण रिझर्व्ह बँकेने ठेवलेले लक्ष अजुनही पूर्ण झालेले नाही. ऑक्टोबर 2022 मध्ये किरकोळ महागाई 6.77 टक्के होती. केंद्रीय बँकेने किरकोळ महागाई दर 2 ते 6 टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय बुधवारी जाहीर केले जाणार आहेत. यावेळी रेपो दरात वाढ करण्याबाबत मध्यवर्ती बँक कमी वाढवण्याची भूमिका घेऊ शकते. कारण महागाईचा दर खाली आला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही घसरत आहेत.

रिझर्व्ह बँकेने पाच महिन्यांतच रेपो दरात जोरदार वाढ केली होती. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने या वर्षी मे ते सप्टेंबर दरम्यान रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे.

यावर्षी, मे महिन्यापासून रेपो दरात वाढ सुरू झाली, कोणतीही पूर्व माहिती न देता, RBI ने घाईघाईत एमपीसीची बैठक बोलावली आणि रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली. त्यानंतर ते 4.40 टक्के झाले. पुढील महिन्यात जूनमध्ये झालेल्या बैठकीत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करून दुसरा धक्का दिला. त्यामुळे रेपो दर 4.90 टक्क्यांवर पोहोचला.

ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करून तिसरा धक्का दिला आणि व्याजदर 5.40 पर्यंत वाढवला. सप्टेंबरमध्ये रेपो रेट पुन्हा 0.50 टक्क्यांनी वाढला आणि तो 5.90 टक्क्यांवर पोहोचला. मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो दरात एकूण 1.90 टक्क्यांची वाढ झाली आहे.

रेपो दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. होम लोनपासून ते कार लोनपर्यंत बँका महाग करतील आणि ग्राहकांचा ईएमआय वाढेल. व्याजदर पुन्हा वाढल्यास, रेपो रेटशी जोडलेली कर्जे महाग होतील आणि तुमचा EMI वाढेल. रेपो रेटवर RBI बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो दर हा आहे ज्यावर RBI पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते.