Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:25 IST2025-10-09T10:59:22+5:302025-10-09T11:25:53+5:30
रतन टाटांनी त्यांच्या सर्व व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग दान करत नेहमी लोकांची मदत केली. त्यांनी सामान्यांसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी ज्या व्यवसायात हात घातला, त्याचं सोनं केलं. चला, त्यांच्या जीवनाची संपूर्ण कहाणी १० महत्त्वाच्या मुद्यांमध्ये जाणून घेऊया...

भारताचे दिग्गज दिवंगत उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांची आज पुण्यतिथी आहे. मागील वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचं निधन झाले. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी प्रेरणादायी ठरले.
देशाचे इतके मोठे उद्योजक असूनही दिखाव्यापासून दूर राहून साधे जीवन जगणाऱ्या रतन टाटांनी त्यांच्याच कंपनीत कर्मचारी म्हणून काम केले आणि त्यांच्या सर्व व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा भाग दान करत नेहमी लोकांची मदत केली. विशेष म्हणजे त्यांनी ज्या व्यवसायात हात घातला, त्याचं सोनं केलं. चला, त्यांच्या जीवनाची संपूर्ण कहाणी १० महत्त्वाच्या मुद्यांमध्ये जाणून घेऊया...
१. जन्म आणि बालपण:
देशातील सामान्य लोकांपासून ते व्यवसाय जगतात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रेरणा ठरलेल्या रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी पारसी कुटुंबात झाला. परंतु त्यांचं बालपण फार चांगलं नव्हतं. १९४८ मध्ये त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर रतन टाटा यांचा सांभाळ त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केला.
२. शिक्षण आणि परदेशातील नोकरी:
प्रारंभिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून बी.आर्क (B.Arch) पदवी प्राप्त केली. एवढा मोठा कौटुंबिक व्यवसाय असूनही, उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परतण्याऐवजी त्यांनी सुमारे २ वर्षे अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये जोन्स आणि इमन्स येथे नोकरी केली. मात्र, १९६२ मध्ये आजी नवाजबाई टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी नोकरी सोडून भारतात परत आले.
३. प्रेमकथा जी अपूर्ण राहिली:
रतन टाटा यांनी कधीही लग्न केले नाही हे संपूर्ण देशाला माहीत आहे, पण याचं कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? त्यांना परदेशात प्रेम झालं होतं, पण त्यांचं लग्न होऊ शकले नाही. याबाबत खुद्द रतन टाटा यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, त्यांना अमेरिकेत प्रेम झालं होतं, पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. आजीची तब्येत बिघडल्यामुळे रतन टाटा भारतात परतत असताना त्यांच्या प्रेयसीनं येथे येण्यास नकार दिला. त्याच वेळी भारत-चीन युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर त्यांच्या प्रेयसीने अमेरिकेतच दुसऱ्याशी लग्न केलं.
४. साध्या कर्मचाऱ्याच्या रूपात कामाला सुरुवात:
अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांच्या मोठ्या कौटुंबिक व्यवसायात मालक म्हणून नव्हे, तर एका सामान्य कर्मचाऱ्याच्या रूपात करिअरची सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबातील सदस्य मालकांच्या पदावर असलेल्या टाटा स्टील मध्ये रतन टाटा यांनी प्लांटमध्ये चुना दगड भट्ट्यांमध्ये टाकण्यासारखी कामं करत व्यवसायातील बारकावे शिकून घेतले.
५. टाटा समूहाची कमान आणि सुवर्णकाळ:
टाटा स्टीलमध्ये काम करून बारकावे समजून घेतल्यानंतर १९९१ मध्ये रतन टाटांनी टाटा समूहाची कमान हाती घेतली आणि त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करताना त्यांनी ज्या व्यवसायाला स्पर्श केला त्याचं सोन्यात रूपांतर केले. दरवर्षी टाटाच्या कंपन्या उत्तुंग शिखरावर पोहोचू लागल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा (Tata Tea, Tata Motors) सह इतर कंपन्या जागतिक स्तरावर यशस्वी झाल्या. जेआरडी टाटा जेव्हा टाटा समूहासाठी उत्तराधिकारी निवडत होते, तेव्हा रतन टाटा हेच सर्वात योग्य व्यक्ती होते. समूहाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी हे सिद्धही केलं. कमान हातात घेतल्यानंतर रतन टाटा यांनी व्यवसायाच्या विस्ताराशी संबंधित प्रत्येक पाऊल जेआरडींचा सल्ला घेऊनच उचलले.
६. सर्वोच्च सन्मान आणि पुरस्कार:
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा व्यवसाय शिखरावर पोहोचला आणि त्यांच्या कंपन्यांचा विस्तार जगभरात झाला. आपल्या मेहनत आणि योग्यतेमुळे रतन टाटांनी विशाल व्यावसायिक साम्राज्य स्थापित केलं. व्यवसाय जगतात ते मोठे नाव बनले. सरकारतर्फे २००० मध्ये पद्म भूषण आणि नंतर २००८ मध्ये पद्म विभूषण ने त्यांना सन्मानित करण्यात आलं. देशातच नव्हे तर परदेशातही त्यांना अनेक सर्वोच्च सन्मान मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' (Order of Australia) या सर्वोच्च नागरिक सन्मानानं त्यांना सन्मानित करण्यात आलं, तसेच फ्रान्समध्येही त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
७. दानशूर आणि प्राणीप्रेमी:
दिवंगत उद्योजक रतन टाटा देशातील मोठे व्यावसायिक असण्यासोबतच अत्यंत दयाळू व्यक्ती देखील होते. याशिवाय, त्यांची ओळख 'डॉग लवर' म्हणूनही होती. भटक्या जनावरांवर त्यांचे विशेष प्रेम होतं. सोशल मीडियावरही ते श्वानांसोबतचे आपले फोटो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आवाहन करणाऱ्या पोस्ट शेअर करत असत. रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले ९८,००० चौरस फूटमध्ये पसरलेले आणि ५ मजली पशु रुग्णालय दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी परिसरात गेल्या वर्षीच सुरू झालं.
८. सर्वसामान्यांसाठी कार
देशातील प्रत्येक व्यक्तीला कारमध्ये प्रवास करता यावा, हे त्यांचं स्वप्न होतं. हे एक असं स्वप्न होते, जे पूर्ण करणं कदाचित प्रत्येकाच्या आवाक्यात नव्हते. रतन टाटांनी टाटा नॅनो लाँच करून २००८ मध्ये ते पूर्ण करून दाखवलं आणि सामान्य माणसाला केवळ १ लाख रुपयांत कार खरेदी करण्याची संधी दिली.
९. दूरसंचार क्षेत्रात क्रांती
टाटा समूहाची दूरसंचार कंपनी Tata Teleservices Limited आणि जपानची NTT DoCoMo यांनी संयुक्तपणे Tata DoCoMo कंपनी भारतात सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांना देशात मोबाईल कॉलिंग परवडणारी सेवा द्यायची होती. त्यावेळी खासगी कंपन्या भारतात मोबाईल व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति मिनिट दर आकारत होत्या. यावेळी टाटा डोकोमो आपल्या ग्राहकांसाठी प्रति सेकंद शुल्क आकारत होती. टाटा डोकोमोनं १ पैसा प्रति सेकंद दर योजना लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरा बदलला.
१०. जीवनातील शेवटचे मतदान
टाटा समूहाला शिखरावर पोहोचवणाऱ्या रतन टाटा यांचे निधन गेल्या वर्षी झालं आणि त्यांनी आपलं जीवनतील शेवटचं मतदानही २०२४ मध्येच केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात त्यांनी ८६ वर्षांच्या वयात मुंबईत आपले मत नोंदवलं होते. एवढं वय आणि आरोग्य समस्या असूनही, रतन टाटा आपला मतदानाचा हक्क वापरताना अत्यंत उत्साही दिसत होते.