दर महिन्याला पैसे हवेत? Post Office मध्ये उघडा हे खातं, व्याज बँकेपेक्षाही जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:49 PM2022-11-16T13:49:23+5:302022-11-16T13:55:39+5:30

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. यामुळे देशातील कोट्यवधी लोकांनी त्यांच्या सर्व योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत.

पोस्ट ऑफिस (Post Office) आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या लहान बचत योजना (Small Saving Scheme) चालवतं. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. यामुळे देशातील कोट्यवधी लोकांनी त्यांच्या सर्व योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत. सुरक्षित गुंतवणूक आणि गॅरंटिड रिटर्न्समुळे पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यापैकी एक म्हणजे मंथली इन्कम स्कीम (Monthly Income Scheme) ही आहे.

या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम मिळू शकते. ही एक प्रकारची पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी पैसे जमा करून दरमहा स्वतःसाठी उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. पोस्ट ऑफिसची ही योजना पाच वर्षांसाठी आहे. परंतु जर तुम्हाला हवं असेल तर या योजनेचा कालावधी तुम्ही पाच वर्षांपेक्षा अधिक वाढवू शकता.

मॅच्युरिटीनंतर तुमची गुंतवणूक केलेली रक्कम परत केली जाते. सध्या मासिक उत्पन्न योजनेत 6.6 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेत जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही 1000 रुपयांमध्ये तुमचे खाते उघडू शकता.

जर तुम्ही या योजनेत 4.5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के व्याजाने 29,700 रुपये मिळतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही रक्कम दरमहा घेऊ शकता. असं केल्यास तुम्हाला दरमहा 2475 रुपये मिळतील. या योजनेअंतर्गत तुम्ही संयुक्त खाते देखील उघडू शकता. त्यानंतर तुम्ही या योजनेत 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकाल.

जर तुम्ही संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवले, तर याजाची रक्कम 59,400 रुपये होईल. ही रक्कम दरमहा घ्यायची असेल तर तुम्हाला महिन्याला 4950 रुपये मिळतील.

मंथली इन्कम स्कीमअंतर्गत तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते.