दिलासादायक बातमी! महागाई काही दिवसांचीच पाहुणी, होणार कमी; आरबीआय गव्हर्नरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 07:11 PM2022-07-09T19:11:05+5:302022-07-09T19:18:07+5:30

Shaktikanta Das on Inflation संपूर्ण जगात महागाई दरात वाढ होत आहे. त्याच वेळी, जागतिक व्यापारात घट झाली आहे. यामुळे ज्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत, अशा गोष्टींवर महागाईचा प्रभाव दिसू शकतो.

महागाईच्या आगीत जनता पुरती होरपळून गेली आहे. विरोधी पक्षाचे मतदारच नव्हे तर भाजपा आघाडीचे मतदारही त्रस्त झाले आहेत. यावर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मोठा दावा केला आहे. 

दुसऱ्या सहामाहीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते मार्चमध्ये महागाई दरात घट होणार असल्याचा अंदाज असल्याचे दास म्हणाले. केंद्रीय बँक महागाईला नियंत्रित करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहे. सध्या चांगले संकेत दिसत आहेत, असे शक्तीकांत दास म्हणाले. 

कौटिल्य आर्थिक संमेलनात बोलताना दास यांनी म्हटले की, सध्या सप्लायचा आऊटलूक खूप चांगले दिसत आहे. सर्व गोष्टी दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीचे संकेत देत आहेत. सध्याची महागाई हळूहळू कमी होऊ शकते असे आमचे आकलन आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची शक्यता कमी होईल, असे दास म्हणाले.

संपूर्ण जगात महागाई दरात वाढ होत आहे. त्याच वेळी, जागतिक व्यापारात घट झाली आहे. यामुळे ज्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत, अशा गोष्टींवर महागाईचा प्रभाव दिसू शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखण्यासाठी रिझर्व्ह बँक आपले धोरण बदलत राहील, असे दास म्हणाले. 

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यातच रेपो दरात वाढ करण्यात आली होती. यानंतर देशातील जवळपास सर्वच बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली होती. जूनमध्ये रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढल्यानंतर तो 4.90 टक्के झाला आहे.

चलनविषयक धोरण समितीने (MPC) एप्रिल आणि जूनच्या बैठकीत 2022-23 साठी महागाई दर 6.7 टक्क्यांवर बदल केला आहे. मे महिन्यात घाऊक महागाईचा दर १५.८८ टक्के होता. त्याच वेळी, एप्रिल महिन्यात 15.08 टक्के होता. 2012 नंतर पहिल्यांदाच महागाईचा दर हा स्तर गाठला आहे. मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.०४ टक्के होता, असे दास म्हणाले.