सणासुदीच्या काळात नोकऱ्यांचा पाऊस, यंदा 3 लाख अधिक भरती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 09:51 PM2021-08-07T21:51:23+5:302021-08-07T22:01:33+5:30

JOB : या सणासुदीच्या काळात, वितरण आणि पॅकेजिंगसारख्या तात्पुरत्या नोकऱ्यांचा पाऊस पडेल.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून वेगाने सावरत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सणासुदीच्या काळात मोठा फायदा होत आहे. या सणासुदीच्या काळात, वितरण आणि पॅकेजिंगसारख्या तात्पुरत्या नोकऱ्यांचा पाऊस पडेल.

ई-कॉमर्सपासून किरकोळ क्षेत्रापर्यंत अशा रोजगार मिळण्याची शक्यता आहे. भारतात सणासुदीचा काळ हा व्यवसायासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. यादरम्यान, उपभोगावर आधारित भारतीय अर्थव्यवस्थेला विक्रीतून मोठी मदत मिळते.

ग्राहक मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करतात, दुकानदार मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री करतात. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते. मात्र, या सर्व फायद्यांसह, हा सणासुदीचा काळ लोकांसाठी रोजगाराच्या संधी देखील आणतो.

आजकाल कंपन्या अनेक कामांसाठी तात्पुरत्या म्हणजेच टेम्पररी कामगारांची नेमणूक करतात. यादरम्यान, या कर्मचाऱ्यांची अधिक भरती होणार आहे.

अनेक नियुक्त करणाऱ्या संशोधन संस्थांच्या अहवालानुसार, तात्पुरत्या कामगारांना सणासुदीच्या काळात चांगले दिवस येणार आहेत. सणासुदीच्यावेळी कामगारांना गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्के जास्त काम मिळेल. याचे कारण असे आहे की बहुतेक किरकोळ विक्रेते ऑनलाईन व्यवसायावर भर देत आहेत.

जास्तीत जास्त रोजगार ई-कॉमर्स, फूड टेक आणि रिटेल क्षेत्रात अपेक्षित आहे. सणासुदीच्या काळात ऑर्डर वाढल्याने या कंपन्यांना वस्तूंची डिलिव्हरी, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, पॅकेजिंग आणि इतर कामांसाठी अधिक लोकांची गरज भासणार आहे.

खरंतर, सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि सवलतींमुळे कंपन्यांना अधिक ऑर्डर येतात. विशेष म्हणजे यावेळी किरकोळ विक्रेते मागणीसाठी महानगर किंवा इतर मोठ्या शहरांवर अवलंबून राहणार नाहीत. यावेळी लहान शहरे मागणी वाढवण्यात मोठी भूमिका बजावतील.

ऑर्डरची वाढती मागणी पाहता ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक कंपन्यांनीही लोकांची भरती सुरू केली आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की, यावर्षी नवीन तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मागणी अचानक वाढली आहे.

या सणासुदीच्या काळात जवळपास 3 लाख लोकांची अतिरिक्त भरती कंपन्यांकडून केली जाईल, असे मानले जाता आहे. ही भरती कंज्यूमर ड्युरेबल, लॉजिस्टिक्स, लाइफ स्टाइल आणि इतर सेगमेंट्समध्ये असणार आहे.

अशा स्थितीत हे निश्चित आहे की, रोजगार वाढ फक्त महानगरांपुरती मर्यादित राहणार नाही. त्याचा लाभ देशाच्या बहुतांश भागात उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटाची वेळ देखील या अंदाजांच्या अचूकतेसाठी जबाबदार असेल. जर तिसरी लाट आली आणि या लाटेने कहर केला, तर परिस्थिती कशी असेल हे सांगणे कठीण आहे.