Farming Business Idea: या लाकडाची शेती, हेक्टरला ३००० रोपे; करोडोत कमाई; औषध, इंधन, कागदच नाही फर्निचरसाठीही वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:39 PM2022-11-18T17:39:45+5:302022-11-18T17:44:33+5:30

पारंपरिक शेतीतून आता फायदा मिळत नाहीय. उलट नुकसानच होतेय. शेतीत घाम गाळा, उत्पादन घ्या आणि बाजार गाठा, तिथे मिळणारा दर पाहून निराश व्हा आणि हातचे जादाचे पैसे घालवून घरी परत या, अशा अनेक बातम्या आपण ऐकतो. कदाचित तुमच्या आमच्या घरातही बाराण्याची भाजी चाराण्याला विकली गेल्याचे प्रकार घडले असतील. यामुळे आताचा तरुण शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगांकडे वळला आहे.

अशाच एका शेतीबद्दल माहिती मिळत आहे. आव्हानात्मक परिस्थितीत एक झाड असे आहे जे हेक्टरी ३००० एवढ्या मोठ्या संख्येने लागवड करता येते. याचे लाकूड औषध, इंधन, कागदच नाही फर्निचरसाठीही वापरतात. म्हणजे याच्या प्रत्येक गोष्टीतून कमाई करता येईल. ही कमाई थोडी नव्हे तर करोडोत करू शकता. महत्वाचे म्हणजे या शेतीसाठी पोषक वातावरण हवेच असे नाही. कसलेली जमीन हवीच असेही नाही.

तुमच्याकडे नेहमीच्या शेतीपेक्षा वेगळी जमीन, जी पडीक आहे, चढ उताराची आहे, अशी असेल तिथे जरी याची लागवड केली तरी बेहतर. ही शेती आले निलगिरीच्या झाडाची. तुम्ही तेलाचे नाव ऐकलेच असेल. परंतू या झाडाचे लाकूड, पान, साल औषध, इंधन आणि कागदासाठी देखील वापरता येते. ते कोणत्याही वातावरणात, ऋतूत वाढते.

निलगीरीचे झाड सुरुवातीच्या पाच वर्षांत चांगले वाढते. यानंतर ते कापता येते. परंतू जास्तीचा नफा हवा असेल तर तज्ज्ञ हे झाड १० ते १२ वर्षांनी कापण्याचा सल्ला देतात. सरकार या शेतीसाठी मदत करत नाही. परंतू शेतकऱ्यांना शेतीसाठी कधीही आडकाठीही आणलेली नाही. या झाडाची रोपे ७ ते ८ रुपयांना नर्सरीत मिळतात. ही झाडे लावण्यासाठी हेक्टरी ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च येईल.

१० ते १२ वर्षांच्या एका झाडापासून ४०० किलोपर्यंत लाकूड प्राप्त होते. या यूकलिप्टस झाडाच्या लाकडाला किलोमागे ६ ते ९ रुपयांचा दर मिळतो. एका हेक्टरला ३००० झाडे लावली तर त्यामागे आरामात एक कोटीच्या आसपास उत्पन्न होते.