वसुली भाईंची तंतरणार! कर्जाच्या रिकव्हरीसाठी शिवीगाळ, अभद्र वागणाऱ्यांविरोधात आरबीआय कठोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:27 PM2022-06-17T16:27:13+5:302022-06-17T16:56:00+5:30

पाहा असं घडल्यास तुमच्याकडे कोणते आहेत पर्याय. काय करू शकाल.

सहसा, लोक आपत्कालीन स्थितीत किंवा अचानक गरज असताना कर्जाची (Loan) मदत घेतात. बरेचदा असे देखील होते की कर्जाचे काही हप्ते (EMI) भरल्यानंतर लोक अडचणीत येतात आणि काही वेळा हप्ते चुकतातदेखील.

यानंतर बँकांचे लोकन रिकव्हरी एजंट (Loan Recovery Agent) कर्जदाराला त्रास देऊ लागतात. कर्ज वसूल करणारे एजंट कधीही अपमानास्पद वागणूक आणि गैरवर्तन किंवा फोनवरून अपशब्दांचा वापरदेखील करताना दिसतात. जरी या सर्व कृती बेकायदेशीर आहेत, परंतु आजकाल ते अगदी सामान्य झाले आहे. आता रिझर्व्ह बँकेनेही (Reserve Bank Of India) कर्ज वसुली एजंटच्या या कृत्यांची गंभीर दखल घेतली आहे.

लोन रिकव्हरी एजंट लोकांसोबत अनेकदा गैरवर्तन करतात हे अमान्य आहे. त्यांच्याकडून कोणत्याही वेळी फोन केला जातो, गैरवर्तन केलं जातं, या गोष्टींची रिझर्व्ह बँकेनं दखल घेतली आहे आणि वेळेस त्यांच्यावर कठोर पावलं उचण्यासही मागेपुढे पाहिलं जाणार नाही, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) म्हणाले.

अशा प्रकारच्या कृती सामान्यत: अनियंत्रित वित्त कंपन्यांकडून केल्या जातात आणि नियमन केलेल्या कंपन्यांच्या बाबतीतही अनेकदा अशा तक्रारी प्राप्त होतात, असं दास यांनी FE Modern BFSI Summit मध्ये बोलताना सांगितलं.

रेग्युलेटेड कंपन्यांच्याबाबतीत रिझर्व्ह बँक कठोर पाऊल उचणार आहे. तर दुसरीकडे अनरेग्युलेटेड कंपन्यांबाबत सांगायचं झालं तर अशा तक्रारी मिळाल्यानंतर एनफोर्समेंट एजन्सीसना याची माहिती दिली जाईल. अशा तक्रारींवरदेखील कठोर पाऊल उचलताना मागेपुढे पाहिलं जाणार नाही. बँकांना यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. आम्ही कर्जदाते आणि सर्व बँकांना याबाबत विशेष लक्ष देण्याचं आवाहन करत असल्याचंही दास म्हणाले.

रिझर्व्ह बँकेच्या यापूर्वीच असलेल्या गाईडलाईन्सनुसार लोन रिकव्हरीसाठी बळाचा वापर करणं किंवा त्याच्या वापराची धमकी देणं छळाच्या कक्षेत येतं. जर कोणताही रिकव्हरी एजंट तुम्हाला त्रास देत असेल तर त्याची तक्रार रिझर्व्ह बँकेकडे करता येते. याशिवाय लोन रिकव्हरी एजंटच्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात कायदेशीर मार्गही आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, वसुली एजंट कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या किंवा छळ करू शकत नाहीत, मग ते तोंडी किंवा शारीरिक असो. कर्जदाराला वारंवार कॉल करणे किंवा सकाळी ९ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ८ नंतर कॉल करणे देखील त्यांचा छळ करण्याच्या श्रेणीत येते.

कर्ज वसुलीसाठी मसल पॉवर वापरणे किंवा धमकी देणे हे छळवणुकीच्या कक्षेत येते. एवढेच नव्हे तर कर्जदाराचे घर किंवा कामाच्या ठिकाणी न कळवता नातेवाईक, मित्र किंवा सहकारी कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि त्रास देणे हाही छळ आहे. धमक्या किंवा अपशब्द वापरणे देखील त्याच्या कक्षेत येते.

वसुली एजंट तुम्हाला त्रास देत असल्यास, तुम्ही सर्वप्रथम बँकेकडे तक्रार करणे आवश्यक आहे. तसेच, बँकेला तुमची परिस्थिती सांगून, तुम्ही कर्ज परतफेडीच्या अटींवर काम केले पाहिजे. बँकेतील तक्रारीचे ३० दिवसांत निवारण न झाल्यास बँकिंग लोकपालाकडे तक्रार करता येईल. रिझर्व्ह बँकेकडेही तक्रार करता येते. रिझर्व्ह बँक बँकेला निर्देश देऊ शकते आणि विशेष प्रकरणांमध्ये दंड देखील करू शकते.

जर वसुली एजंटने कोणतीही बेकायदेशीर कारवाई केली, मारहाण केली किंवा कोणतेही अॅसेट उचलून नेले तर कर्जदार पोलिसांकडे तक्रार करू शकतो. जर जास्त त्रास दिला गेला असेल तर वकिलाशी संपर्क साधून त्याविरोधात न्यायालयाचा दरवाजाही ठोठावता येऊ शकतो. याशिवाय कर्जदाराला लोकअदालत आणि ग्राहक न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे.