Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३० एप्रिल २०२३ ते ०६ मे २०२३: ‘या’ ९ राशींना लाभदायक काळ, प्रगती होईल; चंद्रग्रहण शुभकारक ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 12:14 PM2023-04-30T12:14:34+5:302023-04-30T12:27:08+5:30

Weekly Horoscope: मे महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

मे महिन्याला सुरुवात होत आहे. एप्रिलमध्ये अनेकवि प्रकारचे अद्भूत, दुर्मिळ योग जुळून आले. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुपालट अत्यंत महत्त्वाचा ठरला. गुरुच्या मेष राशीतील आगमनानंतर अनेक प्रकारचे शुभ योग जुळून आले. आता मे महिन्यात चंद्रग्रह, ४ ग्रहांचे गोचर असून, मे महिन्याचा पहिला आठवडा महत्त्वाचा ठरू शकणार आहे.

या सप्ताहात २ मे रोजी शुक्र वृषभेतून मिथुनेत प्रवेश करेल. रवि, बुध, गुरु, राहु आणि हर्षल मेष राशीत आहे. २ मे पासून शुक्र मिथुनेत मंगळाशी युती करेल. केतू तूळ राशीत आहे. प्लुटो मकर राशीत, शनी कुंभ राशीत तर नेपच्यूत मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण या सप्ताहात सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील.

या सप्ताहात सोमवारी मोहिनी एकादशी, बुधवारी प्रदोष, गुरुवारी श्री नृसिंह जयंती तर शुक्रवारी बुद्ध पौर्णिमा व वैशाख स्नान समाप्ती आहे. एकंदरीत ग्रह योग आणि चंद्रग्रहण पाहता तुमच्यासाठी आगामी आठवडा कसा असेल? कोणत्या राशींना आगामी लाभदायक, प्रगती आणि सुखसोयींचा ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: लाभदायक काळ. विविध प्रकारचे लाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. मात्र सतत धडपड करावी लागेल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. पण आपण त्यांना पुरुन उराल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. जवळचे मित्र, मैत्रिणी, भावंडांची भेट होईल. त्यांच्या समवेत मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. जवळचे प्रवास घडून येतील. व्यवसायात भरभराट होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल. टीप- रविवार, सोमवार, गुरुवार चांगले दिवस.

वृषभ: धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. नोकरीत नवीन संधी मिळेल. नातेवाईक, जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या नावलौकिकात भर पडणाया घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याची काळजी घ्या. आपली महत्त्वाची माहिती इतरांना सांगू नका. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

मिथुन: प्रेम प्रकरणे फलद्रूप होतील. विवाह इच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. कामात उत्साह राहील. मनात प्रसन्न विचार राहतील. नवीन कल्पना विकसित होतील. जवळच्या प्रवासाचे, सहलीचे योग येतील. व्यवसायात भरभराट होईल. अपेक्षेपेक्षा जास्त विक्री होईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. मात्र त्यातील अटी आणि शर्ती नीट समजून घ्या. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

कर्क: आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. त्यामुळे बचत कमी होईल. आर्थिक नियोजन नीट करण्याची गरज आहे. प्रेम प्रकरणात फसगत होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणावरही चटकन विश्वास ठेवू नका. कुर्णी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला बाधा येऊ शकते. भावंडांची मदत मिळेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.

सिंह: प्रगतीला पूरक वातावरण राहील. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. कामे आटोक्यात येतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीची साथ राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. अचानक एखाद्या सौद्यात मोठा फायदा होईल. चांगल्या बातम्या कळतील. थोरा मोठ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. मात्र व्यवसायात सतत व्यस्त राहाल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

कन्या: सप्ताहाच्या सुरुवातीला थोडी दगदग, धावपळ होऊ शकते. मनात काळजीचे विचार राहतील. प्रेमात फसवणूक होऊ शकते. विवाह जुळवतांना खबरदारी घ्या. स्थळांची नीट माहिती घ्या. घाईघाईत निर्णय घेऊ नका. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा सल्ला घ्या. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नवीन वस्तू खरेदी कराल. मुलांशी प्रेमाने वागा. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ: सप्ताहाची सुरुवात उत्साहात होईल. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. अनेक अडचणी दूर होतील. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू राहील. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. मात्र कामाचा ताण वाढेल. त्यामुळे चिडचिड होऊ शकते. थोडे संयमाने वागण्याची आणि बोलण्याची गरज आहे. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृश्चिक: नोकरीत कामाचा ताण राहील. नवीन बदल होतील. कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मित्र-मैत्रिणींची साथ मिळेल. वादग्रस्त प्रकरणात हात घातल्यास निष्कारण मनस्ताप सहन करावा लागेल. तसेच अनावश्यक खर्च करावा लागेल. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले तर बरे राहील. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. मात्र लॉटरीवर खूप पैसे खर्च करू नका. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

धनु: भाग्याची साथ राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. विवाहेच्छूंसाठी अनुकूल काळ आहे. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत बदल होतील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. घरी पाहुणे मंडळी येतील. मुलांची प्रगती होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जर एखादी परीक्षा दिली असेल आणि निकालाची वाट पाहत असाल तर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळेल. टीप- रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

मकर: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील. घरी अचानक पाहुणे येतील. काही कारणाने वाद आणि गैरसमज होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जुन्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात वेळ दवडू नका. आर्थिक उलाढाली जपून करा. एखाद्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. तुमचा गैरफायदा घेणाऱ्या व कामापुरता मामा प्रवृत्तीच्या लोकांना गोडीगुलाबीने दूर ठेवा. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कुंभ: नोकरीत अनुकूल घटना घडतील. आर्थिक लाभ होईल. वाहनसुख मिळेल. विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. प्रवासात सतर्क राहा. तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. मौजमजा करण्याच्या निमित्ताने प्रवास होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमचे महत्त्व वाढेल. वाहने जपून चालवा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांचे सहकार्य मिळेल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मीन: आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायात भरभराट होईल. मात्र भागीदारीचे व्यवहार जपून करा. मालाची विक्री चांगली होईल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. घरात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. घराची शोभा वाढविण्यासाठी वस्तू खरेदी कराल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. उसने पैसे देताना विचार करून द्या. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)