Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजाजवळ 'या' वस्तू असल्यास ताबडतोब काढून टाका; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 06:30 AM2023-06-30T06:30:00+5:302023-06-30T06:30:02+5:30

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा सल्ला घेऊन घर बांधणे सर्वांनाच शक्य होते असे नाही, परंतु विकत घेतलेल्या वास्तूची वास्तू शास्त्रानुसार जडण घडण करणे आपल्या सर्वांनाच शक्य आहे. यासाठी आपण वास्तू शास्त्राचे नियम जाणून घेण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतो. या लेखात आपण घराच्या प्रवेश द्वारासंबंधीचे नियम जाणून घेऊ.

घराचे प्रवेशद्वार हा वास्तूचा मुख्य भाग! देवी लक्ष्मी तिथूनच घरात प्रवेश करते. ते स्वच्छ तर असलेच पाहिजे, शिवाय अनावश्यक गोष्टी तिथे ठेवणे टाळले पाहिजे. त्या गोष्टींमुळे लक्ष्मी मातेचा प्रवेश तर होणार नाहीच, मात्र नकारात्मक लहरींचा शिरकाव होऊन वास्तूचे भवितव्य धोक्यात जाऊ शकते. म्हणून कोणती सावधगिरी घ्यायची ते पाहू.

घराची साफसफाई करणे हे रोजचे काम आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य चांगले राहते आणि कुटुंबामध्ये आजारांचा प्रादुर्भावही कमी होतो, परंतु अनेकदा स्वच्छता केल्यानंतर लोक झाडू मुख्य दारामागे ठेवतात.वास्तू शास्त्रानुसार तसे करणे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की घराच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ झाडू ठेवल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत नाही. सुख तुमच्या घरात येण्याआधीच वाट बदलतात. त्यामुळे झाडू ठेवायचाच असेल तर तो स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात उभा ठेवावा, पण मुख्य प्रवेश द्वारामागे ठेवू नये.

केराची टोपली, कचरा कुंडी घरात कुठे ठेवावी हा मोठा प्रश्नच असतो. विशेषतः शहरातल्या छोट्या घरात हा प्रश्न मुख्यत्त्वे जाणवतो. अशा वेळी लोक घराच्या दाराबाहेर केराची टोपली ठेवतात. आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य असले तरी प्रवेश द्वाराच्या बाजूला केराची टोपली ठेवणे चुकीचे आहे. बाहेरून येणारी व्यक्ती असो नाहीतर माता लक्ष्मी तिचे पहिले लक्ष केराच्या टोपलीवरच जाईल, म्हणून ती तिथे ठेवणे योग्य नाही. अशा वेळी झाकण असलेला केराचा डबा स्वयंपाक घरात ओट्याच्या खाली ठेवावा आणि घर मोठे असेल तर किचन बाल्कनीत ठेवावा परंतु प्रवेश द्वाराशी ठेवू नये आणि त्यावर नेहमी झाकण बंद राहील याची दक्षता घ्यावी.

जागेअभावी अनेक जण घराच्या प्रवेश द्वाराशी चप्पल स्टॅन्ड ठेवतात. विखुरलेल्या चपलांऐवजी स्टॅन्डचा पर्याय चांगला आहेच, परंतु त्याचे स्थान प्रवेश द्वाराशी असणे चांगले नाही. त्यामुळे वैयक्तिक प्रगतीत अडथळा येतो, होणारी कामे अर्धवट राहतात आणि घरात काही ना काही कारणाने आजारपण राहते. म्हणून चपलांचा स्टॅन्ड ठेवायचा असल्यास प्रवेश द्वाराच्या मागे ठेवावा परंतु द्वाराच्या बाजूला किंवा बाहेर दर्शनीय स्थितीत ठेवू नये.

घराच्या मुख्य दाराजवळ मनी प्लांट लावावे पण दाराबाहेर कदापि लावू नये, अन्यथा घरातील पैसा, संपत्तीचा ओघ घराबाहेरच्या दिशेने जातो. मनी प्लांट मुख्य दाराजवळ लावावे. ते दिसायलाही सुंदर दिसते शिवाय त्यामुळे आवक अर्थात मिळकतही वाढते. त्यासाठी मनी प्लांटची वेल उर्ध्व दिशेने म्हणजे छताच्या दिशेने वाढेल अशा बेताने बांधावी म्हणजे प्रगती होते. मात्र चुकूनही ती घरातून दाराबाहेर डोकवेल अशा स्थितीत ठेवू नये.